शरद पवारांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले, अजित पवारांचा दावा

 राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले होते. त्यानुसार विकास डोळ्यांसमोर ठेवून आम्ही सत्तेमध्ये आलो. सुप्रिया सुळे यांना ‘देवगिरी’ बंगल्यावर बोलावून झालेला निर्णय सांगितला होता. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. मात्र आम्हाला गाफील ठेवण्यात आले, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व नंतर वेगळे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यानंतर राजीनामा मागे घेतला. मग आधीच राजीनामा का दिला? असा सवालही त्यांनी केला.

अनिल देशमुख माझ्यासोबत होते

अनिल देशमुख हे माझ्यासोबत होते. त्यांना मंत्रिमंडळात जायचे होते, पण अनिल देशमुख यांच्यावर सभागृहात व बाहेरही अनेक आरोप झाल्याने त्यांना लगेच मंत्रिमंडळात घेता येणार नाही असे भाजपच्या नेत्यांनी आपणास सांगितल्याचा दावा अजित पवारांनी केला.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची आचारसंहितापुढील वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी अजित पवार यांनी आज चिंतन शिबिरात भाषण करताना केली. ते म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही, पण मार्चमध्ये आचारसंहिता लागेल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. बारामती, शिरूर, सातारा, रायगड येथील लोकसभेची जागा आपला गट लढवणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली.

– जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंके यांना नाराजी दूर करण्यासाठी कार्याध्यक्षपदाचे आश्वासन दिले होते, असा दावाही अजित पवार यांनी कर्जत येथे आयोजित शिबिरात बोलताना केला.