राज्यात विकासाऐवजी गुन्ह्यांचा वेग वाढला, अजित पवार यांचा सरकारवर घणाघात

सत्ताधारी आमदारांमुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्याने विकासाचा वेग डबल होईल असा दावा करण्यात आला होता. पण विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुह्यांचा वेग डबल झाला आहे, असा आरोप त्यांनी नियम 292 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.

नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत. दिवसाढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत. गोळीबार करून माणसे मारली जात आहेत. राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले. राज्यात केवळ सत्ताधारीच सुरक्षित आहेत, सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरू आहेत, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करतानाच अजित पवार यांनी या गँगने आता छत्रपती संभाजीनगरमध्येही हातपाय पसरले आहेत असे सांगितले. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड फिरतात, अशा घटनेचा दाखला देतानाच विशेष पोलीस आयुक्तांचे नवीन पद निर्माण करूनही गुंडगिरी कमी झालेली नाही, असे अजित पवार म्हणाले. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यावसायिक आपले व्यवसाय करू शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुंडांना नुसती अटक करून उपयोग नाही तर त्यांना सरकारने पाठीशी न घालता त्यांची पाळेमुळे खणली पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नागपुरात हप्ताखोरी

भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा करणाऱया शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये खुलेआम हप्तेखोरी सुरू आहे, असा आरोप करतानाच एका घटनेचा दाखलाही अजित पवार यांनी दिला. मोक्का लावलेल्या दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकातील कर्मचाऱयाने दीड लाखाची मागणी केल्याच्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले. या हप्ताखोरीला आळा घालण्याऐवजी पोलीस आयुक्तांनी विशेष पथक बरखास्त करून टाकले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत हल्ले, अत्याचार वाढले -सुनील प्रभू’

मुंबईत भुरटय़ा चोऱया, अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. पत्रकार, राजकीय नेत्यांवरील हल्ले, महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. पोलीस यंत्रणेमार्फत कोणतीही कारवाई होत नाही अशी खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणावर भुरटय़ा चोऱया अमली पदार्थांच्या विक्रीमुळे वाढल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आले आहे. अमली पदार्थांचे विव्रेते व त्यांच्या संगनमताने होणाऱया रॅकेटवर कारवाई करावी व दिंडोशी, कुरार गाव या भागात ज्या पद्धतीची विक्री होते त्या ठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. त्याला सहा महिने झाले, पण अद्यापपर्यंत पोलीस यंत्रणेमार्फत कारवाई झाली नाही, याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले.

भाजपा आमदाराचा भाऊ मोकाट

मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्याकडेची दुकाने पहाटे चार वाजता जेसीबी यंत्राच्या माध्यमातून उद्ध्वस्त करणारा भाजपा आमदाराचा भाऊ अजूनही मोकाट असल्याचे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांच्या समक्ष हे पाडकाम झाले तरी पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. हे पाडकाम करण्यासाठी शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात लाठय़ाकाठय़ा, लोखंडी सळई यासारखी घातक हत्यारे घेऊन आले होते. गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत कोणालाही याप्रकरणी अटक करण्यात आली नाही, असे ते म्हणाले.

गोळीबार करणाऱया आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न

सत्तारूढ पक्षाचे दादरमधील आमदार सदा सरवणकर यांनीच गोळीबार केला होता, असा बॅलेस्टीक अहवाल आल्यानंतरही ती गोळी अज्ञात व्यक्तीने झाडली असा दावा केला गेला. मग तो कोण होता, पोलिसांनी त्याचा तपास केला का? असा सवाल करतानाच, सरळ सरळ आपल्या आमदारांना वाचवण्याचा सत्ताधाऱयांचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.

ईडीचे अधिकारी बनून जनतेची लूट
ईडीसारख्या तपास यंत्रणांनी देशभरात धुमाकूळ घातला असताना त्याचा फायदा गुन्हेगारही घेत आहेत. ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱयांना लुटले जात आहे. कुठे आहे तुमची कायदा आणि सुव्यवस्था? कोण सुरक्षित आहेत? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.