माझी उणी-दुणी काढाल तर मी सोडणार नाही!

विरोधकांकडून माळेगाव कारखान्याबाबत वेगवेगळे आरोप होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. याउलट विरोधकांच्या सत्ताकाळात कोण काय करायचे, आताही कोणाकडे कारखान्याचे ड्रायव्हर आहेत हे बघा. पाच वर्षे तुम्ही बोर्डाच्या मीटिंगला येत नाही आणि कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता. हे कोणत्या नियमात बसते, अशी विचारणा करत आपण म्हणतो की, कशाला उगीच कोणाची उणी-दुणी काढायची. पण… तुम्ही माझी उणी-दुणी काढली तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही अशी जाहीर दमबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना केली. बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या माळेगाव कारखान्याच्या संचालक पदासाठी सत्ताधारी अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.