मोदींच्या रोड शोच्या वेळेस अजितदादा ‘नॉट रिचेबल’, घशाचा संसर्ग झाल्याने करताहेत आराम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार गायब झाले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले. उद्यापासून अजित पवार प्रचारात सहभागी होतील असेही सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱयावर येऊन गेले. बुधवारी त्यांनी कल्याण व नाशिकमध्ये जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर मुंबईत रोड शो झाला. पण या सर्व सभांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, अजित पवार नॉट रिचेबल असले की नाराज असतात अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात, पण अजित पवार नॉट रिचेबल नाहीत आणि नाराजही नाहीत.
निवडणूक प्रचार काळात त्यांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. पण उद्यापासून ते पुन्हा निवडणूक प्रचारात सक्रिय होतील, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.