
देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आणि दहशतवादी विचारसरणींना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून SIAने गुरुवारी कश्मीर टाइम्स वृत्तपत्राच्या जम्मू मुख्यालयावर छापा टाकला. या छापेमारीत कश्मीर टाईम्सच्या कार्यालयातून AK-47 गोळ्या, एक पिस्तूल आणि ग्रेनेड लीव्हरसह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
SIAने सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा छापा टाकला. एसआयए अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राचे व्यवस्थापक संजीव केर्नी यांना कार्यालय उघडण्यासाठी त्यांच्या घरातून बोलावले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. याबाबत चौकशी सुरू आहे.
देशविरोधी मजकूर प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली यापूर्वीही कश्मीर टाईम्स वृत्तपत्राच्या जम्मू आणि कश्मीर कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. सध्या, गेल्या काही महिन्यांपासून वृत्तपत्राचे प्रकाशन बंद आहे. दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर, जम्मूसह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. पोलिसांनी अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

























































