
हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस पक्षाचे पुनरुत्थान होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही. सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या या पदावर कायम राहतील असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी राजीनामा देणार का आणि नवीन अध्यक्षांसाठी निवडणुका होणार का असे विचारल्यावर ते म्हणाले, काँग्रेस पक्षाबाबत चिंता करण्याचे काहीही कारण नाही.पक्षाचे पुनरुत्थान होत आहे. त्यामुळे पक्षात उत्साह संचारला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात काँग्रेस पक्षाने समाधानकराक कामगिरी बजावली आहे. हरयाणात काँग्रेसला 31 जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात 44 जागा मिळाल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सोनिया गांधीच पक्षाच्या अध्यक्ष राहतील, असेही अँटनी यांनी स्पष्ट केले आहे. हरयाणात याआधीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांच्या जागा दुपटीने वाढून ती संख्या 31 झाली आहे. याआधीच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या, यंदा त्यात 2 जागांनी वाढ झाली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला 98 जागांवर विजय मिळाला आहे.
अँटनी यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. देशावर गंभीर आर्थिक संकट असून हे संकट अजून गडद होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व स्तरावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकार अपयशी ठरले असून सरकारची धोरणे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.



























































