
बंगळुरूहून भुवनेश्वरला चाललेल्या अकासा एअर विमानाचे लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. खराब हवामान आणि इंधनाचा तुटवडा यामुळे अकासा एअरचे विमान लखनौकडे वळवण्यात आले. इंधनाचा साठा कमी झाल्याने वैमानिकाने पॅन पॅन कॉल दिला. यानंतर लखनौ विमानतळावर फुल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधनामुळे विमानाचे लखनौ विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अकासा एअरचे विमान बोईंग 737 MAX 8 (VT-YAJ) हे प्रकारचे QP1503 हे बंगळुरूहून भुवनेश्वरला चालले होते. विमानात एकूण 194 प्रवासी आणि कर्मचारी होते. गुरुवारी रात्री 8.40 च्या सुमारास भुवनेश्वरमधील खराब हवामानामुळे विमान लखनौकडे वळवण्यात आले. यादरम्यान विमानातील इंधनाचा साठा कमी होऊ लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने, वैमानिकाने ‘पॅन पॅन’ कॉल दिला आणि एटीसीकडे प्राधान्याने उतरण्याची परवानगी मागितली.
वैमानिकाकडून इंधन कमी झाल्याचा इशारा मिळाल्यानंतर एटीसीने रात्री 9.02 वाजता लखनौ विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर केली. विमानतळावर तात्काळ सर्व आपत्कालीन नियमावली लागू करण्यात आल्या. कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी धावपट्टीच्या आसपास अग्निशमन दलाच्या गाड्या आणि आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली. रात्री 9.21 वाजता रनवे 9 वर विमान सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर विमान टॅक्सी करून बे 10 कडे नेण्यात आले. यानंतर रात्री 9.30 वाजता संपूर्ण आपत्कालीन स्थिती मागे घेण्यात आली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान उतरल्यानंतर लखनौमध्ये तीन प्रवासी विमानातून उतरले. त्यानंतर हे विमान लखनौवरून पुन्हा भुवनेश्वरच्या दिशेने निघाले आणि 28 मे 2026 रोजी मध्यरात्री 00.02 वाजता भुवनेश्वरमध्ये सुखरूप उतरले.


























































