
नशिबाचे दान सगळ्यांच्याच पदरात एकसारखं पडत नाही. काहींच्या बाबतीत नशिबाने हात आखडता घेतलेला असतो, मात्र तरीही ज्यांचे जगण्यावर प्रेम आहे, निष्ठा आहे. अशी माणसं रडतखुडत न बसता आपला आनंद आपणच शोधतात. आकाश देशमुख हा अशा लोकांपैकीच एक. आकाश देशमुखला चालता येत नाही, बोलता येत नाही. दोन शब्दही तो नीट लिहू शकत नाही. तरीही आकाशने मोबाईलवर दोन बोटं फिरवून चारोळ्यांसह 400 कविता लिहिल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आकाशने साहित्य क्षेत्रात घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावचा आकाश भास्कर देशमुख हा 30 वर्षीय युवक कवी आणि गीतकार आहे. व्हीलचेअर हेच आकाशचे विश्व आहे. तो व्हीलचेअरवर असला तरी त्याच्यातील कवीने प्रतिभेचे पंख लावून भरारी घेणे सुरूच ठेवले आहे. मोबाईलच्या कीपॅडवर दोन बोटं फिरवून तो मनातलं काव्य टाईप करू लागला. बघता बघता आकाशने शेकडो चारोळ्या आणि कविता लिहिल्या. या कवितांचे आता ‘श्वास कविता, ध्यास कविता’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
आकाशची आई शारदा देशमुख म्हणाल्या, लहानपणापासून आकाशला नीट चालत येत नव्हतं. दहावीपर्यंत त्याने शिक्षण पूर्ण केले. तो बारावी पास होऊ शकला नाही. शाळेत जाताना त्याचे दप्तर दुसरी मुले घेऊन जायची. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली मात्र पंबरेचा त्रास उद्भवला. त्यामुळे त्याला उठता-बसता येईना. त्याला ऐकता येतं, मात्र बोलता येत नाही.
आकाशची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्याचे आईवडील शेती करतात. त्याचे कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देत आहे. त्यामुळे आकाशच्या कवितांचे पुस्तकही काढू शकलो नाही, अशी खंत त्याच्या आईने व्यक्त केली. व्हीलचेअरवरून आकाश साहित्यविषयक घडामोडी किंवा लहानमोठी साहित्य संमेलने यांची मोबाईलद्वारे माहिती घेतो. ऑनलाइन सहभागही होतो.
शब्दांवर प्रेम
आकाशची जगण्यावर निष्ठा आहे शब्दांवर निष्ठा आहे. त्याच्या कवितेतून स्त्रिया, शेतकऱ्यांची दुःख प्रतिबिंबिंत होतात. ‘पुंपण मी वेदनेला लावू कशाचे, वाद वाढता तार… तुटती मनाचे, चांदण्यांना सांगू कसे दुःख अंतरीचे, गुंफलेले शब्द गीत गातो भावनांचे.’ आकाशने लिहिलेले ‘पंढरी ही सुनी पांडुरंगा’ हे गीत कार्तिकी गायकवाड हिने गायले असून संगीत पंडित कल्याणजी गायकवाड यांचे आहे.


























































