
आकाशवाणी, मुंबईच्या वतीने ‘जी -20’निमित्त सादर झालेली ‘मर्मबंधातली ठेव ही’ नाटय़ संगीत मैफल चांगलीच रंगली. यात नाटय़ संगीत परंपरेचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर सादर करण्यात आला. पावसाळी वातावरणात सुरेल मैफल रंगली.
प्रसिद्ध गायक पंडित सुरेश बापट यांनी ‘संन्यस्त खड्ग’ नाटकातील ‘मर्मबंधातली ठेव ही’, संगीत ‘मानापमान’मधील ‘रवी मी हा चंद्र कसा’, ‘सौभद्र’मधील ‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी’, ‘होनाजी बाळा नाटकातील ‘श्रीरंगा कमलाकांता’ ही नाटय़गीतं सादर केली. अनुराधा कुबेर यांनी ‘हे बंध रेशमाचे’मधील ‘विकल मन आज झुरत असहाय’, ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘गंध सभोती रानसाजणी तू तर चाफेकळी’, ‘संत कान्होपात्रा’मधील ‘पतित तू पावना पावना’ अशी नाटय़गीतं सादर केली. तरुण गायक धनंजय म्हसकर यांनी ‘रणदुदुंभी’ नाटकातील ‘दिव्य स्वतंत्र रवी आत्मतेजोमय’, ‘कटय़ार काळजात घुसली’मधील ‘मुरलीधर घनश्याम हे नंदलाल’ अशी पदे वेगळ्या शैलीत सादर केली.
या विविधांगी नाटय़ संगीत गाण्यांनी मैफलीला चांगलीच बहार आणली. त्यांना मकरंद कुंडले (संवादिनी) आणि ज्येष्ठ तबलावादक साई बेंकर यांनी तबल्याची सुंदर साथसांगत केली. आकाशवाणीचे उपमहासंचालक बाबुराजन के. के. या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘आकाशवाणी जी-20’च्या कार्यक्रम प्रमुख अनिता पटेल आणि कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांच्या हस्ते गायक आणि वादकांचा सत्कार करण्यात आला. आकाशवाणीचे निवेदक श्रीराम केळकर आणि सुलभा सौमित्र यांनी या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन केले.


























































