अकबर यांच्या रमाणींविरोधातील मानहानीच्या खटल्याची ३१ ऑक्टोबरला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

माजी परराष्ट्रमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात अकबर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला गुरुवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने दाखल करुन घेतला. आता त्यावरील पुढची सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी अकबर प्रत्यक्ष कोर्टात उपस्थित राहून आपला जबाब नोंदवतील.

अकबर यांच्यावतीने वरिष्ठ वकील गीता लुथरा या खटला लढवत आहेत. अकबर हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. प्रिया रमाणी यांच्या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले आहेत. ही प्रतिष्ठा कमवायला अकबर यांना ४० वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आहे. प्रिया रमाणी यांनी अकबर यांच्याविरोधात बदनामी करणारे अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी केलेले दुसरे ट्विट अपमानजनक आहे. याला १२०० लोकांनी लाइकही केले आहे,असे अॅड. गीता लुथरा यांनी सांगितले .अॅड.लुथरा यांनी लैंगिक आरोप असलेले पत्रकार तरुण तेजपाल यांचा खटलाही याआधी लढला आहे.

एम. जे. अकबर हे माजी पत्रकार असून त्यांच्यावर पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक गैरवर्तन केल्याचे तब्बल २० महिलांनी आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मोदी सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने अकबर यांना बुधवारी आपल्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मानहानीचा खटला मागे घ्या : एडिटर्स गिल्डचे निर्देश

माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमाणीविरोधातील मानहानीचा खटला मागे घ्यावा असे निर्देश एडिटर्स गिल्ड इंडियाने अकबर यांना दिले आहेत. अकबर यांनी हे निर्देश न पाळल्यास रमाणींसह अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या सर्व महिला पत्रकारांना एडिटर्स गिल्ड सर्वतोपरी सहकार्य करील असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, “मिटू” मोहिमेची व्याप्ती देशभरातील विविध क्षेत्रात वाढत आहे. त्याबाबत आपले मत व्यक्त करताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ,कामाच्या ठिकाणीच नव्हे तर सर्वच ठिकाणी महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे.महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार आम्ही आधीच केला आहे. महिलांचा मानभंग करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाऊ नये हे आमचे स्पष्ट मत आहे असेही केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले.माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास मात्र जावडेकर यांनी नकार दिला.