
देवदर्शन करून परतताना झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील पाचजणांचा मृत्यू झाला असून, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावरील अफजलपूर तालुक्यात आज दुपारी ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती नगर येथील नातेवाईकांना देण्यात आली आहे.
बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही), छाया बाबासाहेब वीर अशी मृतांची नावे असून, सायली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकर सूर्यवंशी हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर अफजलपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वीर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नगर येथील तपोवन रोड परिसरामध्ये राहणारे वीर कुटुंब देवदर्शनासाठी अक्कलकोट, गाणगापूर येथे गेले होते. गाडीमध्ये पाचजण होते. तर, दुसऱया गाडीमध्ये अन्य नातेवाईक होते. गाणगापूर येथील दर्शन आटोपल्यानंतर ते नगरच्या दिशेने निघाले होते. अफजलपूर रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठय़ा झाडावर जाऊन आदळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून, पाचजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी तेथील पोलिसांना दिली. अपघातातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली. दरम्यान, नगर शहरातील काही तरुण देवदर्शनासाठी गाणगापूर येथे जात होते. नंबरवरून ही गाडी नगर जिह्यातील असल्याचे पाहून या तरुणांनी मदतकार्य सुरू केले. यातील वैभव सांगळे यांनी स्थानिक पोलीस आणि नगरमधील नगरसेवक निखिल वारे यांना या अपघाताची माहिती दिली. त्यांनी गाडीच्या नंबरवरून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता, हे कुटुंब तपोवन रोड येथे राहणारे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तेथील नातेवाईकांना याची माहिती दिली.
वीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर
n वीर कुटुंब हे नगरमध्ये तपोवन रोड परिसरामध्ये राहात असून, त्यांचे स्वामी समर्थ मिनी मार्केट या नावाचे किराणामालाचे दुकान आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या दोन मुली विवाहित असून, त्यासुद्धा त्यांच्यासमवेत या प्रवासामध्ये होत्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री उशिराने किंवा उद्या त्यांचे मृतदेह नगर येथे आणले जाणार आहे. या अपघातामुळे वीर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

































































