अकोल्यात आढळला पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण

914

अकोला जिल्ह्यात आज अखेर प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील बैदपूरा भागातील रहिवासी आहे. आज दिवसभरा केवळ एक जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाला. त्याचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत 123 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 86 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 85 निगेटिव्ह आहेत. तर एका जणाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. हा रुग्ण ही  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण करुन दाखल करण्यात आला आहे. अद्यापही 37 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे 37 जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून 258 जणांची नोंद झाली आहे. त्यातील 74 जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (57 जण गृह अलगीकरणात तर 17 जण संस्थागत अलगीकरणात) तर 126 जणांचा गृह विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर 57 जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

तीन किमी परिघातील भाग ‘सिल’
जिल्ह्यातला पहिला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हा अकोला शहरातला आढळला आहे. हा रुग्ण ज्या भागातील आहे त्या बैदपूरा या भागाला केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील परिसर  तसेच दोन किमीचा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सिल’ करुन त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरुन कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले. या भागाला सिलबंद राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात असेल, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम 144 नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

घरोघरी होणार तपासणी
मनपाचे आयुक्त संजय कापडणीस हे आता येथील मनपा आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणीसाठी  आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचे पथक तयार करतील. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतील. संपूर्ण परिसर निर्जंतूक केला जाईल. त्यासाठी मनपा मार्फत विशेष अभियान या भागात राबविण्यात येईल. प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होईल व माहिती घेतली जाईल, त्यासाठी येणारे आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकांनी घरातच थांबावे
जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आतातरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कोरोना संसर्गित रुग्ण ज्या बैदपूरा  भागातील आहे तेथून तीन किमी परिसर परिघातील भाग सिलबंद होणार आहे. आता कोरोना विषाणू संसर्ग अकोला जिल्ह्यात आणि शहरातही पोहोचला आहे ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच थांबावे, बाहेर कुणाशीही संपर्क टाळावा, वारंवार हात धुवावे, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

‘पॉझिटिव्ह’ रुग्णाची पत्नी मात्र ‘निगेटिव्ह’
ज्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. या रुग्णासोबत त्याच्या पत्नीचेही नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या पत्नीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे,असेही सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या