टाळी एका हातानेही वाजते, अकोल्याच्या अमोल अनासनेची करामत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका हाताने टाळी वाजत नाही, ही प्रचलित म्हण चक्क खोटं ठरवण्याचे काम केलंय अकोल्याच्या अमोल अनासने याने. अमोलने एका हाताने टाळी वाजवत अनेक विक्रम आपल्या नावे करून घेतले आहेत.

एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या अमोलने इयत्ता दहावीपासून एका हाताने टाळी वाजवण्याचा सराव केला. हात कोपरापासून सरळ रेषेत ठेवल्यानंतर हाताचा पंजा तळव्याकडे झुकवला जातो. हाताच्या बोटांना पंजाचा तळ आपटून त्यातून टाळी वाजते. असं डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी अमोल टाळी वाजवतो. या कामगिरीबद्दल अमोलला वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया या विक्रमाची नोंद करणाऱ्या संस्थेने दोन विक्रमांचे प्रमाणपत्र, दोन मेडल देऊन सन्मानित केलंय. या विक्रमात ‘फास्टेस्ट वन हँड क्लॅपिंग इन अ मिनिट’ हा विक्रम आहे. त्याने एका हाताने एका मिनिटात 300 पेक्षा अधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम स्थापित केला आहे. अमोलने 21 ऑगस्ट 2021 रोजी विक्रम नोंदवत त्याचा व्हिडीओ क्लिपिंग वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाला दिला होता. त्यानंतर अमोलच्या विक्रमाची नोंद 10 डिसेंबर 2021 रोजी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियातर्फे घेण्यात आली. त्यांच्या वेबसाईटला विक्रमाची माहिती देण्यात आली आहे. याआधी नॉनस्टॉप एका हाताने एका तासात 7 हजार टाळ्यांचा विश्वविक्रम त्याने केला होता.

एका हाताने टाळी वाजत नाही, ही म्हण मी खोटी ठरवली आहे. ज्या लोकांना एक हात आहे, अशा लोकांना ही कला प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने मी आत्मसात केली, असे अमोलने सांगितले. जिद्द आणि आत्मविश्वाच्या जोरावर हे शक्य झाल्याचे त्याने सांगितले. अमोल अनासने याने वयाच्या 16 वर्षी एका हाताने टाळी वाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस त्याच्या एका हाताच्या टाळीचा आवाज अत्यंत कमी यायचा, मात्र त्याचा सातत्याने सराव केला आणि तीन महिन्यांच्या सरावानंतर एका हाताने टाळी वाजली. तेथून सतत सराव सुरू ठेवला.

 माझ्या कलेला मी जन्म दिला. कुठेही प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, पण मी जिद्दीने प्रयत्न केले. पुढील काळात या माध्यमातून संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे अमोलने सांगितले. त्याची 23 वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद आहे. त्याने 28 पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.