।। नावातला बाप्पा।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज कांदळगावकर

सहज सोपा… सुलभ गणपती बाप्पा… अक्षरातून तर तो साकारतोच… पण तो जेव्हा आपल्या नावासोबत जोडला जातो तेव्हा त्याचा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर असल्याचे जाणवते…

गणेशाचे रूप हे प्रत्येकाच्या मनात भिनलेले आहे. आपले विचार चांगले असतील तर ते गणेशालाच पोहोचत असतात असं मला वाटतं. चराचरात मला गणेश दिसतो. आज मला झोपेतून पण उठवलं तरी मला गणेशच दिसणार. खरं तर ‘अक्षरगणेश’ हा माझ्या लहानपणीच्या खेळातून निर्माण झालेली संकल्पना आहे. मस्तीखोर असल्यामुळे शाळेत बऱयाचदा शिक्षा व्हायची तसेच ‘अक्षरगणेशा’त सारखे रमत असल्याने मैदानात तासन तास शिक्षा भोगायचो. शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा हुशार नव्हतो, पण मी उत्तम कलाकार होतो एवढे मात्र नक्की. ज्या मैदानात मला शिक्षा व्हायची त्याच मैदानात माझा सत्कारही झाला. परिस्थितीच्या अनेक चढउतारातून इथपर्यंत पोहोचलो आहे, पण खरा सन्मान मिळाला सोशल साईटमुळे.गेल्या सातआठ वर्षांत फेसबुक, व्हॉट्स ऍप ट्विटरच्या माध्यमातून ही कला लोकांपर्यंत पोहोचली. आज जगभरात माझे लाखो फॅन आहेत. कारण माझी कला लोकांपर्यंत पोहोचली आहे. जेव्हा मी सुरुवातीला ही कलाकृती फेसबुकवर टाकली होती, तेव्हा मला भरपूर विरोध झाला.‘‘गणपतीत नाव काढून गणपतीची अवहेलना करता, विटंबना करता’’ इथपर्यंत ऐकावे लागले, पण मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. उलट माझ्या कुटुंबीयांना सांगितले की, आपण आता यशस्वी होतोय असे समजा. कारण एक जबरदस्त विरोध आपल्याला सकारात्मकतेकडे नेत असतो.

akshar-ganesh-1

‘अक्षरगणेश’चे अस्तित्व माझ्या मते फार महत्त्वाचे आहे. ‘अक्षरगणेश’ कलाकृती म्हणजे नावात गणपती. आपल्या आई-वडिलांच्या नावात गणपती काढून ती कलाकृती घरात ठेवायची. प्रत्येकासाठी त्यांचे आई-वडील हे दैवत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांच्या नावामध्ये गणेश काढून घरात ठेवल्याने एक युनिकनेस येतो आणि त्याचा आदरही वाटतो.

नऊ भाषांत ‘अक्षर आविष्कार’!
आज माझे देशविदेशात फॅन आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मल्याळम, कर्नाटकी अशा नऊ भाषांत मी ‘अक्षरगणेश’ कलाकृती साकारतो. मला या प्रत्येक अक्षरात गणेश दिसत असतो.

निःस्वार्थीपणे कलेची सेवा
मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतो. आतापर्यंत मी वीस-पंचवीस लाख माझ्या या कलेसाठी खर्च केले आहेत. तेही अगदी निःस्वार्थीपणे. त्यासाठी कोणाकडून त्याचे पैसे घेत नाही. एवढेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शाळा फिरून त्यांना ही कला शिकवतो. एकदा अनाथ विद्यालयात गेलो तेव्हा काहींनी कपडे, काहींनी फळे, काहींनी भेटवस्तू दिल्या आणि मी त्यांना कला दिली. आयुष्यभरासाठी. ही कला इतकी साधी आहे की, मुलांनी त्यावर री ओढावी आणि त्यातून दोन पैसे कमवावे हाच माझा हेतू असतो. कारण उद्या त्यांना त्यांच्या पावलावर उभे राहायला त्याची फार मदत होणार आहे. मुलांनी शिकावं आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे.

आतापर्यंत तीन रेकॉर्ड…
कठीण गोष्टींना सुरुवात केली की, पुढचे आयुष्य सोपे वाटायला लागते. तिथून मी फार मोठी झेप घेतली. पेपराकर कुंचलाचा आणि रंगाचा कापर करून 25 सेकंदांत मी एक कला सादर करतो. आतापर्यंत मी तीन वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 108 संस्कृत नावांमध्ये कलाकृती केली आहे. ही कलाकृती एका तासात झाली तेव्हा तासाभरात 108 गणपती केले तर तीन तासांत तीनशे गणपती होतील असे वाटले, पण तीन तासांत 407 कलाकृती करण्याचा माझा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. दुसऱया रेकॉर्डमध्ये इंग्लिश सिग्नेचरमध्ये एका तासात 191 कलाकृती काढल्या आणि तिसरे रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत 2687 दिग्गजांना माझी कला भेट दिली.

आता 25 हजार कलाकृतींचा टप्पा
कुठल्याही ‘अक्षरगणेश’ या कलाकृतींसाठी मी कधीच कुठल्याही प्रकारचा सराव केलेला नाही, पण उभे राहण्याचा सराव करतो. माझी ग्रिप, माझी ताकद, माझी उभं राहण्याची क्षमता ओळखण्यासाठी दाराजवळ पाच फुटांचा बांबू लावलेला आहे. त्यावर तासन्तास उभा राहतो आणि डोकं शांत ठेवतो. बाकी काहीच करत नाही. आता मला पंचवीस हजार कलाकृतींपर्यंत पोहोचायचे आहे.