ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब?

993

काही दिवसांपूर्वी ओटीटी म्हणजेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यासंबंधीची वृत्तं येत होती. गुलाबो सिताबो या बहुचर्चित चित्रपटासह अनेक चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शितही होत आहेत. या दरम्यान अक्षय कुमार याच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचीही चर्चा सुरू झाली आहे. कारण, हा चित्रपटही ओटीटीवर झळकणार अशी माहिती मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट संपूर्णपणे चित्रीत झालेला असून त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम अडलं होतं. लॉकडाऊनमुळे थांबलेलं हे काम सध्या सुरू झालं असलं तरी त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नाही. निर्मात्यांना कमीत कमी एक महिना चित्रपटावर काम करावं लागणार असल्याने नेमक्या कोणत्या तारखेला टीझर, ट्रेलर आणि मुख्य चित्रपट प्रदर्शित होणार यावर विचार सुरू होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हा चित्रपट 125 कोटींना विकण्यात आला असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच तुषार कपूर, शरद केळकर आणि कियारा अडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट दाक्षिणेकडील सुपरहिट हॉरर चित्रपट ‘कंचना’ याचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अक्षय तृतीयपंथीयाच्या भूताची भूमिका करत आहे. हा चित्रपट नेमका कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, ते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या