अक्षय तृतीया तोलाची, खान्देशात ‘आखाजी’ मोलाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. बी. एन. चौधरी

आखाजी खान्देशवासीयांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. सर्व सणांमध्ये तोलाची आहे. शेतकऱयासाठी ती नववर्षाची सुरवात आहे. शेतीच्या नियोजनाची, भविष्यातील संकल्पांची नांदी आहे. कष्टकरी सालदार, शेत-मजुरांसाठी वर्षभराची मजुरीची बेगमी आहे. लेकीसाठी माहेरचा विसावा आहे. लहान मुलींसाठी आनंद-उत्सवाचं घबाड आहे. खवैयांसाठी गोडधोड मिष्ठांन्नाची चंगळ आहे. नशीब आजमावून पाहणाऱया, पत्ते खेळणाऱयांसाठी श्रीमंत होण्याची एक संधी आहे, जावयांसाठी मान-पान आणि भेटवस्तूंचा लाभ आहे. काय नाहीये या सणामध्ये? सारं काही आहे आखाजीत. म्हणून तर ती सगळ्यांच्या प्रीतीची आहे. ती भरभरून शक्ती देते – लढायला आणि जगण्यालाही.

मनाला वाटते आहे,
कधी येणार आखाजी?
बसोनी उंच झोक्यावर,
कधी गाणार आखाजी?
खान्देशात, गावगाडय़ातील प्रत्येक सासुरवाशीण स्त्रीच्या मनातली तगमग व्यक्त करायला, या ओळी पुरेशा आहेत. चैत्र, वैशाखाचं ऊन रणरणू लागलं की, तिच्या मनात सतत हाच विचार घोळत असतो, कधी येणार आखाजी? ती मनानेच माहेरी पोहोचते. आखाजीनिमित्त दाराशी बांधलेल्या उंच झोक्यावर स्वार होऊन आखाजीची गाणी गाऊ लागते. म्हणायला सण असला, तरी प्रत्येक सासुरवाशिणीला आखाजी आपली सखी, मैत्रीण वाटत असते. त्यामुळे हा सण-उत्सव खान्देशात तोलामोलाचा मानला जातो.

कोरोनाच्या सावटाखाली अक्षय तृतीयेचा आनंद झाकोळला गेला होता. मात्र आता लॉक डाऊन उठल्यानंतर देशभरात अक्षय तृतीया आणि खान्देशात आखाजी हा सण उत्साहात साजरा होणार आहे. मराठी माणूस हा संकटावर मात करून सतत जगण्यातला आनंद शोधत असतो. परंपरेने येणारे हे सण उत्सवच त्याची इम्युनिटी वाढवतात. सणातला उत्साह, हाच त्याचा ऑक्सिजन असतो. यातूनच तो आपलं दुःख विसरून जगणं सुसह्य करत असतो.

खान्देशात अक्षय तृतीयेला मोठा मान आहे. याच दिवशी खान्देशात आखाजी सण साजरा होतो. खान्देश हा कृषीप्रधान असल्याने येथे राहणारा नागरिक हा शेतकरी, शेतमजूर किंवा शेतकऱयांच्या घरातील शिकलेली मुले-मुली आणि सध्या सरकारी नोकरदार झालेले सुशिक्षित यांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे परंपरेनुसार खान्देशी माणसाला आखाजीचं मोठं अप्रुप वाटतं. खान्देशी माणसाचं नवीन वर्षच आखाजीला सुरू होतं.

आखाजी सण हा रणरणत्या उन्हाळ्यात येतो. या काळात शेतकऱयाची शेतजमीन मशागत होऊन पडलेली असते. शेतीची सर्व कामं झालेली असतात. शेतकरी नवीन हंगामासाठी पावसाकडे तसाच लेकीच्या आगमनासाठी तिच्या सासरकडे आतुरतेने डोळे लावून बसलेला असतो. तसा तो निवांत झालेला असतो. या सणासाठी त्याची लेक माहेरी येणार असते. ती तिच्या सासरी तिला न्यायला येणाऱयाची वाट पहात असते. दारी असलेल्या झाडावर कावळा बसला आणि तो कावकाव करू लागला की तिचा माहेरची आठवण अधिकच उचंबळून येते.

सासरी तिला सतत राबराब राबावंच लागतं. अनेकांच्या पाचवीला पूजलेला सासुरवास हा त्यांना चैत्र-वैशाखाच्या उन्हासारखा दाहकच वाटतो. यातून थोडा विसावा मिळावा म्हणून ती माहेराला दोन दिवस जाण्याची संधी शोधते – जी तिला आखाजी मिळवून देते. माहेर तिला, मातीच्या घडय़ातील थंड पाण्याची शीतलता देतं. ही पोळलेली लेक घरी येणार म्हणून तिची आई लाटपाटच्या (आदल्या) दिवशी शेवया, सांजोरी, घुन्या करून ठेवते. त्यात तिची माया दडलेली असते. यासाठी तिची उडालेली झुंबड बघण्यासारखी असते. येथे आल्यावर आई, वडील, भाऊ, भावजयी, भाचे कंपनी पाहून तिचं मन तृप्त होतं.

आईच्या हातच्या गरमागरम खापरावरच्या पुरणपोळ्या म्हणजे तिच्या जिवाची आवड. मनसोक्त पुरणपोळी खाण्याची हौस ती येथे पुरवून घेणार असते. गोडधोड खाणं झालं म्हणजे मैत्रिणींसह गुजगोष्टी. सासरची एकमेकांची उखाळी-पाखाळी आणि गंमतीजमती करत साऱया झोक्याचा आनंद घेतात. घरात अगोदरच गौराईची स्थापना केलेली असते. ही गौराई म्हणजे पार्वती. तिला लहान मुली आपल्या परीने सजवतात. विविध खाद्य पदार्थांच्या माळा चढवतात. ज्यात काजू, बदाम, किसमीस, डांगर, टरबूजाच्या बिया, सांजोरी यांचा समावेश असतो. लेकीला आवडीचं भरपूर खाऊ घालावे हा भाव या खेळात असतो. हा संस्कार लहान मुलींमध्ये बालवयातच बिंबवला जातो.

आखाजी आणि दिवाळी म्हणजे सासुरवाशिणींच्या मैत्रिणीच. या दोघांमुळे सासरी नांदणारी लेक माहेराशी नाळ जुळवून असते. त्यात तिच्या मदतीला धावून येतात ती आखाजीची गाणी. ही प्रामुख्याने अहिराणीतूनच असतात. अहिराणी ही मधूर आणि आईसारखी मायाळू वाटते. लेकीच्या मनातली गोष्ट ही गाणी बाहेर आणतात. तिला हलकं करतात.

दिवसभर खेळ, गाणी, दंगा, मस्तीत गेल्यावर रात्र येते. तेव्हा ही सासुरवाशीण लेक आईच्या मांडीवर डोकं ठेवून आणि कुशीत तोंड खुपसून ढसाढसा रडते. आपलं मन मोकळे करते – जे ती बाहेर जगाला सांगू शकत नाही. अशा पद्धतीने मनातले उमाळे मोकळे करून ती निरभ्र आभाळासारखी प्रसन्न होते. आईची बोटं मायेनं तिच्या पाठीवर, केसात फिरतात आणि तिला नवीन ऊर्जा मिळते. एक विश्वास प्राप्त होतो.

हा विश्वास तिला नवं बळ देतो. जगण्याची नवी उमेद देतो. येथे तिला सासर-माहेरा मधला फरक समजतो. माहेर हे मायेचं आहे. मोठय़ा प्रीतीचं आहे. मात्र किती दिवस? दोन, चार, आठ, पंधरा दिवसच. माहेर श्रीमंत असो की गरीब, ते लग्नानंतर तिला परकंच झालेलं असतं. तिचं हक्काचं घर सासरीच असतं. सासरची रीत वेगळी. तिथली शिस्त वेगळी. तरी तेच तिचं घर. ती मनात धन्याची वाट पाहते आणि सासरी जावंच लागेल, हे मनाला पुनःपुन्हा पटवून देते. हेच जीवनाचं चक्र आहे. ते सण-उत्सवाच्या माध्यमातून सतत गतिमान राहतं. जगण्यात नवोन्मेश पेरतं.

सण-उत्सव येतात आणि जातात. ही तर जगरहाटीच आहे. मात्र हेच सण-उत्सव नात्यांना जुने होऊ देत नाहीत. नाविन्य देतात. त्यांना उजळवून काढतात. जगण्यासाठी बळ देतात आणि आशेचा नवा अंकुर प्रसवतात. खान्देशात शहरी भागात कमी दिसत असली तरी ही परंपरा ग्रामीण भागात आजही जपली जात आहे. तो एक सांस्कृतिक ठेवा आहे. या दिवशी कितीही अडचण, गरज असली तरी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये. कारण तेदेखील अक्षय टिकून राहते. असा समज आहे – ज्यायोगे दारिद्रय़, दुःख पदरी येऊ शकतात – जी जगण्यात निराशा आणू शकतात.

आखाजी खान्देशवासीयांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. सर्व सणांमध्ये तोलाची आहे. शेतकऱयासाठी ती नववर्षाची सुरुवात आहे. शेतीच्या नियोजनाची, भविष्यातील संकल्पांची नांदी आहे. कष्टकरी सालदार, शेत-मजुरांसाठी वर्षभराची मजुरीची बेगमी आहे. लेकीसाठी माहेरचा विसावा आहे. लहान मुलींसाठी आनंद-उत्सवाचं घबाड आहे. खवैयांसाठी गोडधोड मिष्ठांन्नाची चंगळ आहे. नशीब आजमावून पाहणाऱया, पत्ते खेळणाऱयांसाठी श्रीमंत होण्याची एक संधी आहे, जावयांसाठी मान-पान आणि भेट वस्तूंचा लाभ आहे. काय नाहीये या सणामध्ये? सारं काही आहे आखाजीत. म्हणून तर ती सगळ्यांच्या प्रीतीची आहे. ती भरभरून शक्ती देते – लढायला आणि जगण्यालाही.

(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
[email protected]