प्रेरणादायी अक्षय तृतीया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रामकृष्ण विनायक अभ्यंकर

अक्षय तृतीया सर्वांनाच सर्वांगांनी प्रेरणादायीच ठरते. ती आपल्याल्या बरेच शिकवत असते. नावाप्रमाणे कधीही क्षय म्हणजेच नाश न पावणारी ही तिथी. वैशाख मासातील शुक्लातील तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. या तिथीस खूप महत्त्व आहे. हिंदू वर्षातील एकूण साडेतीन तिथी पवित्र मानल्या गेल्या आहेत. त्यातील अक्षय तृतीया ही एक असते.

आपल्या हिंदू पद्धतीनुसार वर्षभर कृतज्ञता /स्मरण म्हणून दिन, वार, जन्मदिन, प्रकट दिन, स्मरणदिन इ. साजरे करीतच असतो. त्यानिमित्ताने मनोरंजन, संस्कार, प्रेरणा , उपकार, विद्या, कला संवर्धनाद्वारे आत्मविकासासोबत सामाजिक प्रगती साधायची असते. त्यामुळे सारा समाज सुसंस्कारित, आरोग्यवान, सामर्थ्यवान, संपत्तीवान, भावनाशील, सत्प्रवृत्त व्हावा ही आपल्या पूर्वजांची किमान अपेक्षा आहे, ती योग्यदेखील आहे.

पौराणिक महत्त्व – या पवित्र दिवशी भगवान परशुरामांचे स्मरण केले जाते. ‘सप्तचिरंजीव श्लोका’त परशुरामाचे सातवे स्थान आहे. श्लोक…‘अश्वत्थामा, बलि, व्यासो चिरंजीवना…’ परशुराम हा अत्री व रेणुकामाता या तापस पती-पत्नीचा अत्यंत पराक्रमी सुपुत्र. आपल्या पित्याच्या केलेल्या वधासाठी वधकर्त्यांना शासन म्हणून परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. त्यामुळे क्षत्रिय वर्गावर मोठी दहशत बसवली गेली. माहूर गडावर रेणुकाला झालेले हे शेवटचे अपत्य होते. त्याच्या अंगी असलेली मातृ-पितृभक्ती व अन्यायाची चीड व अफाट पराक्रम आपल्या जीवनात मोठे आदर्श ठरतात.

धार्मिक महत्त्व – या महत्त्वाच्या तिथीला सर्वांगीण महत्त्व जरूर आहे. साहजिकच विचार व कृती होणे तितकेच गरजेचे आहे. वास्तविक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे चैत्रापासून सर्वांगीण संपन्नतेची सुरुवात होत असते. गुढीपाडव्यापासून सर्वांच्या उत्साहाला जणू उधाण आलेले असते. माहेरवाशिणी म्हणजे गौरी माहेरी वास्तव्यास येतात. अक्षय तृतीयेपर्यंत सर्वत्र उत्साह व मांगल्य म्हणून गौरीदेवी पूजन व हळदी-कुंकू आदी अन्य कार्यक्रम संपन्न होतात. त्यामुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. या कार्यक्रमात कैरीचे पन्हे, आंब्याची डाळ आवर्जून केली जाते. काळानुरूप लोकगीतेदेखील गायली जातात. खेडय़ात अक्षय तृतीया मोठय़ा थाटात साजरी होते. त्यास अश्विनी असे म्हणतात. या दिवशी गोडाधोडाचे अवश्य जेवण केले जाते. त्यानिमित्ताने ठेवणीतील कपडे घातले जातात. याच दिवसापासून शेतीची कामे केली जातात.

सांस्कृतिक महत्त्व – खचितच अक्षय तृतीया सर्वांनाच सर्वांगांनी प्रेरणादायीच ठरते. ती आपल्याल्या बरेच शिकवत असते. नावाप्रमाणे कधीही क्षय म्हणजेच नाश न पावणारी ही तिथी. वैशाख मासातील शुक्लातील तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. या तिथीस खूप महत्त्व आहे. हिंदू वर्षातील एकूण साडेतीन तिथी पवित्र मानल्या गेल्या आहेत. त्यातील अक्षय तृतीया ही एक असते. कोणतेही शुभ काम करण्यास त्यासाठी वेगळा मुहूर्त अर्थातच पाहिला जात नाही. जात्याच मनुष्यप्राणी बुद्धीची देणगी घेऊन आल्याने तो समाजप्रिय असतो. त्यातूनच सण, वार, उत्सव, परंपरा या संकल्पना समाजात रूढ झालेल्या आहेत. उत्सव म्हणजे सर्वांसह विकसित होणे. ‘उ’ म्हणजे उन्नत होणे व ‘सव’ म्हणजे बरोबर घेऊन हा ‘उत्सव’ शब्दाचा अर्थ निघतो.

पितरांचे महत्त्व – या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावांनी अनेक दाने केली जातात. गरजूंना मदत केल्याने सामाजिक विषमता काही अंशी तरी दूर होण्यास मदत होते. अक्षय तृतीया माहात्म्यात त्यासंबंधी कथादेखील सांगितली आहे.
वसंत ऋतू म्हणजे कडक उन्हाळा असला तरी सर्वत्र बहरलेली वनश्री, कोकिळेचे मधुर गुंजारव मनास नक्कीच उभारी देते.