
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला मान्सून यंदाच्या हंगामात निराशा करणार आहे. संपूर्ण देशात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’ हवामान प्रणालीचा परिणाम मोसमी पावसावर दिसून येणार आहे. पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात पर्जन्यमानात घट होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने मंगळवारी वर्तवला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई-महाराष्ट्रात मार्चपासूनच उष्म्याने कहर केला. महिनाभरात चार वेळा उष्णतेची लाट धडकली. उष्णतेची तीव्रता वाढल्याने यंदा मान्सून समाधानकारक हजेरी लावेल, अशी अटकळ बांधणाऱ्या नागरिकांना मंगळवारी ‘स्कायमेट’च्या अंदाजाने धक्का दिला. ‘एल निनो’ या हवामान प्रणालीमुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, पावसाळी हंगामासाठी 868.6 मिमी. असलेल्या दीर्घकालीन सरासरीच्या 94 टक्के इतकाच मोसमी पाऊस यंदा हजेरी लावणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरच्या दुसऱ्या सत्रात मान्सूनचा जोर मंदावणार आहे. विषुववृत्तीय पॅसिफिक महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो अधिकाधिक तीव्र होत जाईल. ‘एल निनो’चे पुनरागमन मान्सून कमकुवत करण्याचेच संकेत आहेत, असे ‘स्कायमेट’चे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी स्पष्ट केले.
हवामान खात्याचा अंदाज पुढील आठवडय़ात
‘स्कायमेट’ संस्थेने चिंता वाढवणारे भाकीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष आता सरकारी हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागले आहे. हवामान खाते पुढील आठवडय़ात मान्सून हंगामासाठीचा पहिला अंदाज जाहीर करणार आहे.
‘दुष्काळ’ पडण्याची 30 टक्के शक्यता
यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 94 टक्क्यांच्या पातळीवर राहण्याची शक्यता 40 टक्के आहे. तसेच ‘दुष्काळ’ पडण्याची शक्यता 30 टक्के असल्याचे ‘स्कायमेट’च्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कमी पावसाबरोबरच दुष्काळाच्या सावटाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढवली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या उर्वरित भागाच्या तुलनेत पूर्व आणि ईशान्येकडील भागांची स्थिती अधिक चांगली असेल, असेही संस्थेने नमूद केले आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांमध्ये पर्जन्यमानात घट होऊ शकते. त्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



























































