माऊलींच्या प्रस्थानानंतर

1750

पं. कल्याण गायकवाड

आषाढीनिमित्त माऊलींची पालखी पंढरपुरात निघते.. त्यानंतरची आळंदी कशी असते….

आळंदी म्हटलं की डोळ्यांपुढे फक्त आणि फक्त श्री ज्ञानेश्वर महाराज उभे राहातात. माऊलींची आळंदी म्हणूनच हे शहर प्रसिद्ध आहे. वर्षभर माऊली आळंदीत असतातच, पण आषाढी एकादशीच्या निमित्त माऊली पालखीतून पंढरपूरला रवाना होतात. त्या कालावधीत माऊली आळंदीत नसतात. पण घरातला कर्ताधर्ता पुरुष काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यावर घर कसे सुने सुने वाटू लागते, अगदी तीच गत आषाढीनिमित्त माऊली पंढरपूरला जातात त्या वेळी तेथे मागे उरलेल्यांना वाटायला लागतं. ज्ञानेश्वर माऊलींवर जिवापाड प्रेम करणारे वारकरी या कालावधीत त्यांच्या पालखीसोबतच पंढरपूरला जातात. पण ज्यांना तेथे पायी जाणे जमत नाही त्यांना किंवा वयोवृद्धांना मागे आळंदीतच तेवढे दिवस माऊलींशिवाय राहावे लागते. हे दिवस ते कसे कंठतात ते केवळ त्यांनाच ठाऊक.

माऊलींच्या मागे आळंदीचे वातावरण नेमके कसे झालेले असते ते तसं शब्दात सांगणं कठीण आहे. कारण माऊली असताना जे आळंदी उत्साहाने नुसती ओसंडून वाहात असते. महाराजांचे प्रस्थान होते ते दोन दिवसही एखाद्या उत्सवासारखा लोक साजरा करतात. या प्रस्थान सोहळ्याला केवळ स्थानिकच नव्हे, तर आसपासच्या बऱयाच गावांमधील भाविक, वारकरी खास येथे येतात. त्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. दोन दिवस भक्तिमय वातावरण असतं. या दोन दिवशी काही कार्यक्रमही असतात. त्यानंतर सकाळी पालखी निघाली की गावातले काहीजण एक ते दोन किलोमीटर पालखीसोबत जातात. ‘पालखी वाटेला लावायला जायचं असतं’ असं म्हणतात. त्यावेळी पूर्ण गाव मोकळा होतो. पालखी पंढरपूरच्या वाटेला लागली की ज्याच्या त्याच्या पद्धतीने गावातील लोक परत येतात. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निघते. त्यानंतर साधारण आठ वाजल्यापासून आळंदीचं वातावरण एकदमच ओस पडल्यासारखं होतं. हुरहूर लागते.

जे लोक मागे राहातात त्यांना हुरहूर लागून राहाते की आपणही पालखी वाटेला लावायला जायला हवं होतं. माऊली तेवढीच जास्त काळ सोबत राहिली असती. कुणाला करमतच नाही. हे वातावरण एक-दोन दिवसच राहात नाही, तर पालखी परत येईपर्यंत तसेच असते. लोकांना कशातच मन लागत नाही. माऊली पंढरपूरला गेल्यानंतर मंदिरात चक्रांकित महाराजांची हरिपाठाची कीर्तने होत असतात. सोहळ्यासोबत जे लोक जाऊ शकलेले नसतात ते या कीर्तनाला जाऊन मन रमवतात. पालखी जेव्हा परत येते तेव्हा आपली आईच घरी आल्याचा आनंद तेथील गावकऱयांना होत असतो. उत्साह वाढतो. माऊली येणार त्या दिवशी कुणी पुण्यापर्यंत घ्यायला जातो, तर कुणी चार-पाच किलोमीटरपर्यंत जाऊन तेथून पालखी यात्रेत सहभागी होतो. त्या वेळी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. प्रत्येकाच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहात असतो.

आषाढी एकादशीच्या दिवशी तर आळंदीत फारसं कुणी नसतंच. ज्यांना गाडय़ांनी जाणं शक्य असतं ते आपापल्या मोटारगाडय़ांनी पंढरपूर गाठतात आणि आषाढीला विठुरायाचं दर्शन घेतात. पण हे लोक फार कमी आहेत. येथे उरलेल्या लोकांनाही आषाढी एकादशीला पंढरपूरचेच वेध लागलेले असतात. म्हणजे त्यांचे देह आळंदीमध्ये असतात, पण चित्त मात्र पंढरपूरला गेलेलं असतं. माऊली आळंदीत असते तेव्हा संध्याकाळी ४ ते ५ दररोज प्रवचन असतं. संध्याकाळी ६ ते ८ कीर्तन असतं. साडेआठला माऊलींची आरती होते. मग ९ वाजता पुन्हा दर्शन सोहळा सुरू होतो. रात्री ११ वाजता शेजआरती होते.

आषाढीला रथ निघतो…

माऊलींची पालखी फक्त आषाढी एकादशीनिमित्तच आळंदीबाहेर पडते असं नाही. प्रत्येक गुरुवारी सकाळी ९ वाजता पालखी निघतेच. ती मंदिरातल्या मंदिरातच फिरवली जाते. त्या वेळी वारकरी मंदिरात येऊन मंदिराला पालखीची प्रदक्षिणा घालतात. पालखी आठवडय़ाला निघत असली तरी आषाढी एकादशीला रथ बाहेर काढला जातो. हे या पालखीचे वेगळेपण असते. या पालखीत माऊलींच्या पादुका असतात. दर गुरुवारी ही पादुका असलेली पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालतात. हा कार्यक्रम दर आठवडय़ाला साधारण दीड ते दोन तासांचा असतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या