अलंकापुरीत माऊलींचा रथोत्सव उत्साहात; 728 वा संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी जय्यत तयारी

ज्ञानोबा माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव रविवारी ( दि.10 ) भाविक, वारक-यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवात श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा, आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. हरिनाम गजरात मिरवणूक प्रदक्षिणा श्री विठ्ठल जयघोषात झाली. आळंदीतील ग्रामस्थ युवक, तरुणांनी रथ हाताने ओढत नामजय घोषात रथोत्सव साजरा केला.

सोमवारी ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी दिन सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत नामजयघोषात साजरा होत आहे. रथोत्सवापूर्वी श्रींची पालखी खांद्यावर गोपाळपुर येथे आळंदी ग्रामस्थांनी हरिनाम गजरात आणली. यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी , विवेक इनामदार सेवक परिवार, राजाभाऊ रंधवे चोपदार, बाळासाहेब चोपदार, योगीराज कुऱ्हाडे, मंगेश आरु, योगेश आरू, बाळकृष्ण मोरे, गोविंद ठाकूर तौर, ज्ञानेश्वर घुंडरे, भीमराव घुंडरे, आळंदी देवस्थानचे सेवक, कर्मचारी, वारकरी भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.

गोपाळपुरातून हरिनाम गजरात रथोत्सव सुरु झाला. यावेळी राज्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनास गर्दी केली. प्रदक्षिणा मिरवणूकींने रथोत्सवाचे स्वागत विविध ठिकाणी उत्साहात झाला. यावेळी अळणीतील विविध संस्थांनी रथोत्सव सोहळ्याचे स्वागत केले. ग्रामस्त व भाविकांनी रथ ओढत प्रदक्षिणा केली. रविवारी द्वादशी दिनी महानैवेद्यास दर्शन बंद नंतर गाभारा खुला करून दर्शन सुरू करण्यात आले. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. यावेळी खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांचे वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे हस्ते श्रींची पंचोपचार पूजा झाली. शासकीय पहाट पूजा दिनी तहसीलदार प्रशांत बेडसे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, संतोष वीरकर आदी उपस्थित होते.

रथोत्सवाला निघण्यापूर्वी पालखी फुलांनी सजविण्यात आली. या पालखीत माउलींचा चांदीचे मुखवटा पालखीत वैभवी पूजा बांधीत ठेवण्यात आला. तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत शनि मंदिर येथून गोपाळपुरात आणली. येथील श्री कृष्ण मंदिरात इनामदार परिवार तर्फे पूजा, आरती परंपरेने झाली. माउलींचा रथोत्सव प्रदक्षिणेत चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक येथून मार्गस्थ होत हरिनाम गजरात रथोत्सव झाला. या नंतर मंदिर प्रदक्षिणा ,धुपारती झाली. मंदिरात हरिभाऊ बडवे व केंदूरकर महाराज यांचे तर्फे कीर्तन नंतर गाभाऱ्यात खिरापत प्रसाद, प्रसाद वाटप झाले. विना मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख,सेवेकरी यांना नारळ वाटप झाले.

ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदीत सोमवारी (दि. 11) होत आहे. मंदिर, नदी घाट परिसरात संजीवन समाधी दिनाचे प्रसंगावर आधारित सोहळ्या निमित्त कीर्तने होणार आहेत. माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते पवमान अभिषेक व दुधारती परंपरेने होणार होईल. श्री नामदेव महाराज यांचे नामदास परिवार तर्फे पूजा व कीर्तन सेवा होणार आहे. श्रींचे समाधीवर पुष्प वृष्टी, आरती, घंटानाद आदी कार्यक्रम होणार असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

दक्षता घेत इंद्रायणी नदीपात्रात प्लास्टिक रोप

यावर्षी इंद्रायणी नदी पात्रात भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. ते म्हणाले, भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रात खोल पाण्यात पुढे जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. यासाठी NDRF टीम, आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल यांचे माध्यमातून नदीपात्रात प्लास्टिक रोप सोडत दक्षता घेण्यात आली आहे.

आळंदी करिती यात्रेतील द्वादशी निमित्त आळंदी परिसरातील विविध धर्मशाळा, मठ, मंदिरे यांचेसह श्रीरामकृष्णा वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात झाला. या निमित्त हजारो भाविक, वारकरी यांना ज्ञानदानासह अन्नदान सेवा झाली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर यांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले.

आळंदी देवस्थान मध्ये श्रींचे संजीवन समाधी दिन सोहळ्याची तयारी सुरु असून मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत लक्षवेधी पुष्प सजावट केली जात आहे. यासाठी सेवक, कामगार यांनी पुष्प सजावटीचे जुळवाजुळवीस लक्ष केंद्रित केले आहे.

माऊली मंदिरात श्रींचा 728 वा संजीवन समाधी दिन सोहळा

कार्तिकी यात्रा 2023 मधील श्रींचा 728 वा संजीवन समाधी दिन सोहळ्यास भल्या पहाटे घंटानादाने सुरुवात होईल. यात पहाटे पवमान अभिषेक व दुधारती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते होईल. पहाटे पाच वाजले पासून श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7 वाजता हैबतबाबा यांचे पायरी पुढे श्रीगुरु हैबतबाबा आरफळकर यांचे वतीने कीर्तन सेवा, दरम्यान त्याच वेळी विणा मंडपात कीर्तन सेवा, याचवेळी भोजलींग काका मंदिराचे निकम दिंडी यांचे तर्फे कीर्तन, परंपरेने विना मंडपात 9 वाजता श्री नामदेवराय यांचे वंशज नामदास महाराज यांचे परिवाराचे वतीने श्रींचे संजीवन समाधी दिन सोहळ्यावर आधारित कीर्तन सेवा सुरु होईल. दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रींचे संजीवन समाधी दिनानिमित्त घंटानाद व पुष्पवृष्टी, श्रींची आरती परंपरेने होईल. मानकरी, मान्यवर यांना संस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप होईल. त्यानंतर महानैवेद्य होत आहे. सोमवारी मंदिरातील विना मंडपात सोपानकाका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन, रात्री धुपारती, साडे नऊ वाजता कारंजा मंडपात भजन सेवा, रात्री परंपरेने जागर हैबतराव यांचे तर्फे होणार आहे.