
सामना प्रतिनिधी । नांदेड
बनावट दारुच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून दारुचा मोठा साठा जप्त केला. शहरातील हडको आणि वासरी परिसरात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत तीन लाख रुपये किंमतीची बनावट दारु आणि इंडिका कार जप्त करण्यात आली आहे.
शहरातील हडको परिसरासह वासरी येथे बनावट दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक डी.एन.चिलवंतकर, एस.एस. खंडेराय, एस.एम.बोधनवार, दुय्यम निरीक्षक बी.एस.मंडलवार, ए.एम.पठाण व टी.बी.शेख यांच्या पथकाने आज मंगळवारी हडको व वासरी परिसरात छापा मारुन बनावट विदेशी दारुचा मोठा साठा जप्त केला. पथकाने दोन्ही ठिकाणी छापा मारुन गणेश मोतीराम बेंडे व सदाशिव राठोड यांना अटक केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून हा कारखाना सुरु असून, सिडको ग्रामीण पोलिसांचे याकडे लक्ष कसे गेले नाही. असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आज मंगळवारी बनावट विदेशी दारुचा मोठा साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

























































