
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने चिंता वाढली असताना आणखी एका नव्या स्ट्रेनने त्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. मंगळवारी इथल्या हेनान प्रांतात एका लहान मुलाच्या शरीरात बर्ड फ्ल्यू H3N8 स्ट्रेनचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. पक्षी-प्राण्यांमध्ये आढळणारा हा स्ट्रेन पहिल्यांदाच मानवी शरीरात आढळल्याने चीन आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे.
चीनच्या राष्ट्रीय विभाग आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाच्या शरीरात बर्ड फ्ल्यू H3N8 स्ट्रेन सापडल्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र याच्या संक्रमणाची जोखीम फार कमी असून घाबरण्याची गरज नाहीय. या मुलाला ताप आला होता आणि त्याबरोबरच बरीच लक्षणं दिसत होती. त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरात बर्ड फ्ल्यू H3N8 स्ट्रेनची लक्षणे आढळली आहेत.
एनएचसीच्या माहितीनुसार मुलाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तापसणी केली असता घरातील कोणत्याही व्यक्तीला याचे संक्रमण झालेले नाही. मात्र मानवी शरीरात अशाप्रकारचा स्ट्रेन सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुलाच्या घरात कोंबडी, कावळा असून तो त्यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे या दरम्यान त्याला संक्रमण झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
चीनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार H3N8 स्ट्रेन हा आतापर्यंत जगात घोडा, कुत्रा, पक्ष्यांमध्ये सापडला आहे, मात्र मानवी शरीरात अशाप्रकारचा स्ट्रेन पहिल्यांदा मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, या व्हायरसची अशी लक्षणं मिळाली नाहीत जी एकमेकांपासून पसरेल आणि महामारीचे रुप घेईल. पण तरीही आरोग्य विभागाची टिम लक्ष ठेऊन आहे.
























































