गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २२ फेब्रुवारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । बीड

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आता पुढील महिन्यात म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे, इच्छुक वधू-वर पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

दुष्काळात सापडलेल्या पालकांना मदतीचा हात देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य देवून पंकजा मुंडे ह्या कन्यादान करणार आहेत. हा सोहळा २३ जानेवारी रोजी होणार होता परंतु जास्तीत जास्त इच्छुक वधू-वरांना याचा लाभ व्हावा, या दृष्टीने पालकांनी सोहळ्याची तारीख वाढवावी, अशी विनंती पंकजा मुंडे यांना केली होती. त्यानुसार हा सोहळा आता २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वा. वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी परळीत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नांव नोंदणी १० फेब्रुवारी पर्यंत
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छू वधू वरांना किंवा त्यांच्या पालकांना आता १० फेब्रुवारी पर्यंत नांव नोंदणी करता येणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी व (अरूणोदय मार्केट), अंबाजोगाई (डॉ. आंबेडकर चौक) येथील संपर्क कार्यालयात ही नोंदणी सुरू असणार आहे. विवाहाची नोंदणी पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, मात्र नोंदणीसाठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, वधू व वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.