तरुणीवर रॉडने हल्ला करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करा ! सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्तांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने श्रद्धा भोईर या तरुणीवर लोखंडी रॉडने चार दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी हल्लेखोर माथेफिरूवर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. एका शिष्टमंडळाने आज न्हावा- शेवा बंदर विभागाचे सहपोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहल यांची भेट घेतली असून त्या तरुणावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

न्हावा गावातील श्रद्धा भोईर या तरुणीला प्रितम म्हात्रे याने दोन वर्षांपूर्वी लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नासाठी आरोपीला नकार दिला होता. या नकाराचा राग प्रितमच्या मनात होता. तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत माणिक टोक परिसरात २६ जुलै रोजी काही कामासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी नकाराचा राग उफाळून आल्याने प्रितम म्हात्रे याने श्रद्धा भोईर हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून पलायन केले. मैत्रिणींनी आरडाओरडा करून गावकऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला दहा टाके पडले आहे.

न्हावा गावातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या प्रितम म्हात्रे याला महिलांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी केली. एसीपी डॉ. विशाल नेहल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने चर्चा केली. याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भावना घाणेकर, जेएनपीए कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, जनवादी संघटनेच्या हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कांती कडू, शेकापचे जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, जासई सरपंच संतोष घरत, हनुमान भोईर, हरिश्चंद्र म्हात्रे, किशोर घरत, संजय ठाकूर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते