‘ऑल द बेस्ट’ नाटक पुन्हा येतंय!

मुका, बहिरा, आंधळय़ा मित्रांची धमाल कॉमेडी घेऊन 15 वर्षांनी पुन्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकातून रंगभूमीवर पुन्हा हास्यकल्लोळ होणार आहे. देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’मध्ये मयूरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील हे तीन चेहरे दिसणार आहेत.

‘ऑल द बेस्ट’ एकांकिका 90 च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. 31 डिसेंबर 1993 ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 30 वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभूमीवर इतिहास घडवला.

या नाटकाने अनेक तगडे कलाकार इंडस्ट्रीला दिलेच, पण भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे सुपरस्टारसुद्धा दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून करीअरची सुरुवात केली. ‘ऑल द बेस्ट’ नाटक 12 भाषांमध्ये प्रदर्शित झाले असून त्याचे सुमारे दहा हजार प्रयोग झाले आहेत.