
राज्यभरात ‘युवा कब्बड्डी लीग’ स्पर्धेच्या नावाखाली खेळाडूंची बेकायदेशीरपणे निवडप्रक्रिया सुरू असून खेळाडूंना गंडा घालण्याचा डाव सुरू आहे. पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे 6 डिसेंबर रोजी या स्पर्धेची बेकायदेशीरपणे निवड चाचणी होत असून याविरोधात पलूस पोलीस ठाण्यामध्ये व प्रशासनास तक्रार करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी राज्य असोसिएशनची परवानगी घेतली नसल्याने खेळाडूंची आर्थिक फसवणूक होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनकर पाटील म्हणाले, सध्या राज्यातील शहरी व ग्रामीण कबड्डीपटूंना ‘प्रो-लीग’ स्पर्धेचे आकर्षण आहे. त्यामुळे या खेळाडूंना ‘युवा कबड्डी लीग’चे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा डाव इतर राज्यांतील काही आयोजकांकडून होत आहे. याआधीही सांगली जिल्ह्यात ‘प्रो-लीग’च्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक करण्याचा डाव झाला होता. तो असोसिएशनने हाणून पाडला होता.
सध्या ‘युवा कबड्डी लीग’च्या नावाखाली राज्यात विविध ठिकाणी निवड चाचणी सुरू आहे. परंतु यासाठी राज्य संघटनेची कोणतीही मान्यता न घेता ही प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी निवड प्रक्रियेतून प्रत्येक खेळाडूकडून 500 रुपये फी आकारली जात आहे. त्यामुळे यातून फसवणूक होऊ शकते. या खेळाडूंना लिलावानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असे सांगितले जात आहे. या लीगचा खेळाडूंना कोणताही फायदा होणार नसून झालीच तर आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा सचिव नितीन शिंदे, अजित भोसले व पदाधिकारी उपस्थित होते.
निवड चाचणीविरोधात पलूस पोलीस ठाण्यात तक्रार
सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्पर्धा घेण्यास परवानगी नसतानाही ‘युवा कबड्डी लीग’च्या नावाखाली ही निवडप्रक्रिया सुरू आहे. जेथे जेथे ही चाचणी होणार आहे, तेथील जिल्हा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन या लीगसाठीची निवड चाचणी बंद केली आहे. सांगलीतील दुधोंडी येथे 6 डिसेंबरला निवडप्रक्रिया होणार आहे. यात आर्थिक फसवणुकीचा उद्देश दिसत आहे. याविरोधात पलूस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून राज्य असोसिएशन व जिल्हा असोसिएशन यावर कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
































































