तुरुंगात मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना भाजपची ऑफर; CM केजरीवाल यांचं मोठं विधान

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. असे असले तरी त्यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर हल्लाबोल केला. देशाला या हुकूमशाहीपासून आणि गुंडागर्दीपासून वाचवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपवर निशाणा साधला. ‘मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. जर केजरीवाल भ्रष्टाचारी आहे. तर या दुनियेत कोणीही प्रामाणिक नाही. आम्हाला तुरुंगात डांबलं जात आहे. कारण आम्ही जे काम करत आहोत, ते काम मोदी करू शकत नाहीत”, अशी जळजळीत टीका यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

“ज्या मनीष सिसोदीया यांनी चांगल्या शाळा बनवल्या ते दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. ज्या सत्येंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक बनवले त्यांनाही तुरुंगात डांबण्यात आले आहे. तसेच त्या दोघांना मेसेज देण्यात आला आहे. तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला जामीन मिळवून देऊ. असं कोण करतं?”, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या लोकशाहीविरोधी धोरणावर सवाल उपस्थित केला.

“खरचं कोणता घोटाळा झाला आहे का? ते कधी म्हणतायत 100 कोटींचा घोटाळा झाला आहे. तर कधी म्हणतायत 1100 कोटींचा घोटाळा झाला आहे. तर मी प्रश्न विचारतो की तो पैसा गेला कुठे? यांनी 500 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. मात्र यांच्या हाती काहीही लागले नाही. मग हे सर्व हवेत तर उडून गेले नाही ना? हा पैसा कुठेतरी खर्च झाला असेल”, असे केजरीवाल म्हणाले.

मोदींनी एका मुलाखतीमध्ये माझा उल्लेख अनुभवी चोर असा केला होता. त्यामुळे बहुतेक पुरावे उपलब्ध नव्हते, म्हणून मोदींनी संपूर्ण देशासमोर कबूल केले की त्यांच्याकडे पुरावे नाहीत आणि या प्रकरणात कोणतीही वसुली झाली नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मी भगतसिंग यांचा शिष्य आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते तुरुंगात गेले. देश वाचवण्यासाठी आम्ही तुरुंगात जातोय. देशहितासाठी त्यांनी मला आयुष्यभर तुरुंगात ठेवले तरी माझी कोणतीही तक्रार नसेल. माझ आयुष्य या देशासाठी आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.