अमरावतीत नवे 66 कोरोनाबाधित, धारणीत थैमान

387

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रयोगशाळेतील अहवालात 66 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात मेळघाटातील धारणी तालुक्यात 33 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 2294 झाली आहे. येथील शासकीय रुग्णालयात हा अहवाल प्राप्त झाला असून संबंधित रुग्ण हे अमरावती शहर व ग्रामीण भागातील आहे.

या सर्वांना वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात भती करण्यात आले आहे. स्थानिक अमरावती शहरातील पॅराडाईस कॉलनी येथे 5 कोरोनाग्रस्त आढळून आले असून केकतपूर येथील 4 तर बडनेरा शहरात चार रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच ग्रामीण भागातील अंजनगाव सुर्जी सह इतरही गावात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. आतापर्यंत मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुका कोरोनाबाधितापासून दूर होता. मात्र मेळघाटात काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी अमरावती शहरात राहतात.

हे सर्व कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात हजर झाले. त्यामुळेच या दोन्ही तालुक्यात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी एक आदेश पारित करून मुख्यालयीच हजर राहण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील अनेक कर्मचारी व अधिकारी रेडझोनमधून चिखलदरा व धारणी तालुक्यात जातात. व त्यामुळेच मेळघाट सुद्धा आता कोरोनाग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या