औरंगजेबाच्या कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याचे पत्र देण्याची तरी हिम्मत दाखवा, अंबादास दानवे यांचे भाजपला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ambadas-danve

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्यात औऱंगजेबावरून सुरू असलेल्या दंगली व राजकारणावरून भाजपला फटकारले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपला जर इतकाच औरंगजेबाचा तिटकारा आहे तर त्यांनी त्याच्या कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याचे पत्र देण्याची तरी हिम्मत दाखवावी.

”बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ जाणीवपूर्वक नजरेआड करते. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले आहे.