भाजपकडून मिंधे आणि अजित पवार गटाचे नेते फोडण्याचे काम सुरूच, अंबादास दानवे यांची टीका

एकमेकांचे नेते फोडायचे नाही असा भाजप आणि मिंधे गटात करार झाला आहे, असे असले तरी भाजपकडून मिंधे गटातील नेते फोडण्याचे काम सुरूच आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच या कराराचे उल्लंघन सुरू असल्याचेही दानवे म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले की दानवे म्हणाले की, संभाजीनगर महापौरपदाचा उमेदवार शिंदे गटाचा असूनही भाजपासाठी माघार घेतोय. तिथल्या महिला पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा अनेक घटना सध्या घडत आहेत. हा व्यवहार सुरूच राहणार असे दिसते. या परिस्थितीत अजित पवारांना पुन्हा पुन्हा अमित शहांकडे धाव घ्यावी लागते, आणि राज्यातील सत्ताधारी नेते या सर्व घडामोडीकडे दुर्लक्ष करत आहेत.

महानगरपालिका मतदार याद्यांवर बोलताना दानवे यांनी गंभीर विसंगतींचा मुद्दा उचलला. सीमेबाहेरील हजारो मतदार विशिष्ट वॉर्डात दाखल झाले आहेत, तर सीमेतील मतदार दुसऱ्या वॉर्डात टाकले जात आहेत. चार–चार, पाच–पाच हजार मतदार अशा चुकीच्या पद्धतीने हलवले गेले, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले. सुधारणांची अपेक्षा असताना पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसते. आणि यामागे काम करणारी शक्ती सत्ताधाऱ्यांना उघड मदत करते, असा दावा त्यांनी केला. दानवे यांनी काल गुलाबराव पाटील आणि यापूर्वी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यांचा हवाला देत म्हटले की, भाजप पैसे आणि सत्तेचा वापर करून माणसं फोडते, हा आरोप आम्ही तीन वर्षांपूर्वीच केला होता. आता त्यांचीच माणसं फुटू लागल्यावर त्यांना ही वेदना जाणवतेय.

दानवे म्हणाले की, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण झाले. जामनेरमध्ये उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभे केले. अहमदनगरमध्ये उमेदवारांना फॉर्म भरू नयेत म्हणून प्रचंड दबाव आणला गेला, अशी माहिती त्यांनी दिली. दानवे म्हणाले की, जिल्हाध्यक्षच अपहरणाला बळी पडत असतील, तर निवडणुका मोकळ्या वातावरणात कुठे होत आहेत? सत्ताधारी पक्षाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे असेही दानवे यांनी यावेळी नमूद केले.