नार्वेकरांवर कुणाचा दबाव, माहिती घ्यावीच लागेल!अंबादास दानवे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 11 मे 2023 रोजी सर्वेच्च न्यायालयाने निकाल दिला होता. आता सप्टेंबर महिना संपत आला तरी अजूनही वेळकाढूपणा सुरूच आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे, सर्वेच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या कालावधीत ते कोणाकोणाला भेटले होते, याची माहिती घ्यावीच लागेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिला.

अपात्रतेसंदर्भात निकाल कधी देणार याच्या तारखा जाहीर करा अशी आमची मागणी नाही पण सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर निकाल द्या, असा टोला दानवे यांनी नार्वेकर यांना हाणला. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला प्रचंड विलंब केला आहे. आपल्यावर दबाव टाकला जातो असेही ते म्हणतात. त्यामुळे त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? त्यांनी आजवर कुणाकुणाची भेट घेतली, मार्गदर्शन घेतले, असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो, असे दानवे म्हणाले.

कायद्यानुसारच निर्णय घ्यावा लागेल

राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात नवा असा काही निर्णय घ्यायचा नाहीये. त्यांनी फक्त अपात्रता कायद्याचा अर्थ लावावा एवढीच अपेक्षा आहे. जो अर्थ लावायाचा तो लावा मात्र कायद्याच्या कसोटीवर घासून लावा, असे यावेळी दानवे नार्वेकर यांना उद्देशून म्हणाले.