भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांना अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील सूत्रधाराच्या पक्षप्रवेशावरून अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना आणि भोकरदन परिसर हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्या हातांत कायद्याच्या बेड्या असायला हव्या होत्या, त्या हातात भाजपचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का, असा संतप्त सवाल दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून विचारला आहे.

अंबादास दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करताना भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. पैशांच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा ‘कत्तलखाना’ उघडणारा आणि मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करणारा आरोपी 45 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, याच आरोपीला भाजपच्या नेत्यांनी रेड कार्पेट अंथरून पक्षात स्थान दिले, हे अत्यंत भयंकर असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच ‘पवित्र’ होतो का, ही तुमची नेमकी कोणती ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ योजना आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे पोलीस या आरोपीचा शोध घेत असताना दुसरीकडे तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा, असा सवाल करत दानवे यांनी भाजपच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेवरही निशाणा साधला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे असे उघड समर्थन करणे महाराष्ट्रासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणावरून आता आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होण्याची शक्यता दिसत आहे. हे ट्विट करतानाच त्यांनी सोबत रविंद्र चव्हाण यांच्या गळ्यात हार घालताना फोटो तर बातम्यांची कात्रणेही शेअर केली आहेत.