फडणवीस दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख! अतिवृष्टीसाठी अब्जावधी जमा, मदत फक्त ७५ हजार रुपयांची; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ambadas danve slams devendra fadnavis over minimal spending from cm assistance fund for flood-hit farmers (1)

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister’s Assistance Fund) जमा झालेल्या निधीच्या खर्चावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दानवे यांनी ट्विटद्वारे असा आरोप केला आहे की, मुख्यमंत्री सहायता निधीत अब्जावधी रुपये जमा असतानाही सरकारने केवळ नाममात्र रक्कम खर्च केली आहे.

दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख’ अशी टीका केली आहे.

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये’, असा महत्त्वाचा मुद्दा अंबादास दानवे यांनी अधोरेखित केला आहे.

‘हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?’, असा गंभीर प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मदत वाटपाच्या धोरणावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.