Lok Sabha Election 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपांवरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू असलं तरी देखील तिढा काही सुटताना दिसत नाही. भाजपनं मिंधे गटाची चांगलीच गोची केल्याचं चित्र आहे. मिंधे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा आणि कल्याण मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. यामुळे मिंधे गटाची चांगलीच दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून सर्वाधिक जागांवर भाजपच कशी लढणार यासाठी संपूर्ण जोर लावत आहे. यावरून एकेकाळी आपल्या मुलाची उमेदवारी सहज घेऊन येणाऱ्या शिंदे यांच्यास्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लक्ष्य केलं आहे.
शिवसेनाप्रमुख आणि आता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व किती दमाचं आहे हे आता शिंदेंना कळत असेल. या भाजपला ते वाकवत होते, झुकवत होते आणि आता तर शिंदेंना त्यांच्या स्वत:च्या मुलाची उमेदवारी त्यांना जाहीर करता आली नाही, जी त्यांच्या हक्काची होती. बाकी संभाजीनगर तर फार लांब आहे. स्वत:चा मुलगा विद्यमान खासदार आहे असं असताना देखील त्यांना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. याचा अर्थ भाजप कशी वागते आणि या भाजपला उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व कसं वाकवत होतं हे त्यांना कळत असेल, असं सुनावलं. तसंच नेतृत्त्व करणं सोपं नसतं, याची जाणिव देखील करून दिली आहे.