आंबेडकर जयंतीसाठी उद्याचा मेगाब्लॉक रद्द करा, शिवसेनेची मागणी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या दादर येथील चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे आंबेडकरी अनुयायांचा महासागर उसळणार आहे. मात्र उद्या पश्चिम आणि मध्य या दोन्ही लोकल रेल्वे मार्गावर मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायी आणि संविधानप्रेमींची गैरसोय होणार आहे. यामुळे हा मेगाब्लॉक रद्द करावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. शिवसेना नेते, सचिव अनिल देसाई यांनी या संदर्भात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थकांना पत्र पाठवून हा मेगाब्लॉक रद्द करावा अशी मागणी केली आहे.