अंबरनाथ, भिवंडी, शहापूरात सुळसुळाट, 31 ‘मुन्नाभाईं’ची दुकानदारी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टरकीची कोणतीही डिग्री नसताना बोगस पद्धतीने एमबीबीएसची दुकानदारी चालवणाऱ्या 31’मन्नाभाईंवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांचा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात सुळसुळाट झाला असून या भामट्यांच्या दवाखान्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत जागोजागी बोगस डॉक्टरांनी दुकाने थाटली होती. या मुन्नाभाई एमबीबीएसचे उपचार अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या भामट्यांना कारवाईचे ‘इंजेक्शन देण्यासाठी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समिती बनवण्यात आली आहे. समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत 37 बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यातील 31 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 31 प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून 30 बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या तालुक्यात एकही बोगस डॉक्टर कार्यान्वित नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त वापेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

एनओसी देण्याआधी शिक्षण तपासा

बोगस डॉक्टरांना व्यवसाय सुरू करण्यापासून रोखण्यासाठी ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्याची परवानगी देताना ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांनी एनओसी प्रमाणपत्र देण्यापूर्वी या डॉक्टरची शैक्षणिक अर्हता आणि अन्य कागदपत्रे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावीत, अशा स्वरूपाचे पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेघे यांनी सांगितले. तसेच बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलीस विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते संरक्षण देण्याची सूचना डॉ.रेंघे यांनी यावेळी केली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.