हिमवादळामुळे अमेरिका ठप्प, १५३ वर्षांत पहिल्यांदाच नामांकित वर्तमानपत्राची छपाई बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेमधील ईशान्य भागातील तीव्र हिमवादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जोरदार वारे आणि अति हिमवृष्टीमुळे विमानतळांची धावपट्टी बंद करावी लागली आहे. हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रविवार ते मंगळवार दरम्यान ११ हजारापेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. फ्लाइट ट्रॅकिंग कंपनी फ्लाइटअवेअरच्या मते, परिस्थिती इतकी गंभीर होती की अनेक प्रमुख विमानतळ तात्पुरते बंद करावे लागले आहे.

रोड आयलंड आणि मॅसॅच्युसेट्सच्या अनेक भागात ३७ इंचांपर्यंत बर्फवृष्टी नोंदवली गेली. रविवार आणि सोमवार दरम्यान न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये जवळजवळ २० इंच बर्फवृष्टी झाली, तर लॉंग आयलंडवरील इस्लिप भागात २२ इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली. रोड आयलंडमधील प्रोव्हिडन्समध्ये ३२.८ इंच बर्फवृष्टीची नोंद झाली. यामुळे १९७८ मध्ये झालेल्या २८.६ इंचाचा मागील विक्रम मोडला. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे जवळजवळ एका दशकातील सर्वात शक्तिशाली नॉर’ईस्टर वादळ आहे. काही ठिकाणी ताशी २ ते ३ इंच बर्फवृष्टी झाली आणि वाऱ्याचा वेग ११० मैल प्रतितास इतका होता.

मुसळधार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांमुळे ईशान्येकडील राज्यांमधील ६ लाखांहून अधिक घरे आणि कार्यालयांमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ५ लाख १९ हजार २३२ घरे आणि कार्यालये अंधारात होती. १५३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, प्रसिद्ध वृत्तपत्र द बोस्टन ग्लोब त्यांची प्रिंट आवृत्ती प्रकाशित करू शकले नाही. बर्फवृष्टीमुळे कर्मचारी प्रिंटिंग प्रेसपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

देशात परिस्थिती बिकट होत असताना, अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली. न्यूयॉर्क शहरातील शाळा, रस्ते, पूल आणि महामार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. नंतर, परिस्थिती सुधारताच, महापौर जोहरान ममदानी यांनी आदेश मागे घेतला आणि शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. दरम्यान, मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी अनेक भागात प्रवास बंदी लागू केली आणि लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले. नॉर’ईस्टर हे एक शक्तिशाली हिवाळी वादळ आहे जे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकते. त्याला नॉर’ईस्टर म्हणतात कारण त्याचे वारे सामान्यतः ईशान्येकडून वाहतात. कॅनडाहून येणारी अत्यंत थंड हवा अटलांटिक महासागरातून येणाऱ्या उबदार, ओलसर हवेशी टक्कर देते तेव्हा ही धोकादायक प्रणाली तयार होते.