संतापजनक! अमेरिकेतील हिंदू मंदिरांच्या भिंतीवर हिंदुस्थानविरोधी लिखाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्वामिनारायण मंदिराला खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले आहे. मंदिराच्या भिंतीवर हिंदुस्थान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. तसेच खलिस्तानी नेता जनरल सिंह भिंद्रनवालेची प्रशंसा केली आहे. यावर हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन देशांत फुटीरतावादी शक्तींना थारा नको, असे स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशन (एचएएफ) ने यासंबंधीचे फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात स्पष्टपणे हिंदुस्थानविरोधी मजकूर लिहिलेला दिसत आहे. अमेरिकेत जी घटना घडली आहे त्याची माहिती मिळाली आहे. हिंदुस्थानने हा मुद्दा अमेरिकन अधिकाऱयांसमोर उपस्थित केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे, परंतु यामध्ये फुटीरतावादी शक्तींना थारा मिळायला नको. यामुळे अमेरिका आणि हिंदुस्थान या दोन देशांतील संबंध बिघडायला नको, असे जयशंकर म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी या घटनेचा निषेध केला. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. मंदिराच्या भिंतीवर हिंदू आणि हिंदुस्थानविरोधी घोषणा लिहिल्या आहेत.