
अमेरिकेतील डलासमध्ये एका 26 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थ्याची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. चंद्रशेखर पोल असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये घबराट उडाली आहे.
मूळचा हैदराबादच्या असलेल्या चंद्रशेखरने दंत शस्त्रक्रियेची (बीडीएस) पदवी घेतली होती. त्यानंतर 2023 मध्ये पुढील शिक्षणासाठी तो डलासला गेला होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याने पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पेट्रोल पंपावर पार्ट टाइम करून तो पूर्णवेळ नोकरीच्या शोधात होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोल शुक्रवारी रात्री एका पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याला एका अज्ञात बंदूकधाऱयाने गोळी मारली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याचे पार्थिव शक्य तितक्या लवकर तेलंगणातील त्याच्या गावी आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशी मागणी भारत राष्ट्र समितीने केली आहे.
महिनाभरातील दुसरी घटना
गेल्याच महिन्यात टेक्सासमधील डलास येथे वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातून हिंदुस्थानी वंशाचे मोटेल व्यवस्थापक चंद्र मौली बॉब नागमल्लैया यांचा पत्नी आणि मुलासमोर शिरच्छेद करण्यात आला होता. या प्रकरणी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.