हिंदुस्थानातील धार्मिक असहिष्णुतेवर मोदींशी बोला, अमेरिकेतील 75 खासदारांचे बायडेन यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत स्वागत करा पण त्यांच्याशी हिंदुस्थानातील चिंतेच्या विषयांवरही बोला. हिंदुस्थानात वाढत असलेली धार्मिक असहिष्णुता, मानवाधिकाराचे प्रश्न, पत्रकारांना लक्ष्य करणे, मीडिया आणि इंटरनेटवरील वाढते निर्बंध हे मुद्देही मोदींबरोबर चर्चेवेळी मांडा, अशी मागणी करत अमेरिकन सिनेटच्या 75 खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱयावर असून, त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मोदी आणि बायडेन यांच्यात बैठक होणार असून, यावेळी काही करार होतील. तसेच पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) संयुक्त सभागृहाला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वीच अमेरिकन सिनेट सदस्य (खासदार) आणि काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र आता उघड झाले आहे. पत्र लिहिणाऱया खासदारांचे नेतृत्व वॅन हॉलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केले आहे. दरम्यान, या पत्रामुळे बायडेन आणि मोदी यांच्यात काय चर्चा होते याकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले आहे.

मोदी-एलॉन मस्क यांची भेट
अमेरिका दौऱयात पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. पंतप्रधान मोदी आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट झाली. भेटीनंतर मस्क म्हणाले, आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. पुढच्यावर्षी हिंदुस्थानात येण्याचा विचार करतो आहे. टेस्ला लवकरच हिंदुस्थानात येईल, असा मला विश्वास आहे.

‘युनो’ मुख्यालयात योग दिन साजरा
पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी 180 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी मनोगत व्यक्त करताना ‘योगा ही हिंदुस्थानची जुनी परंपरा असून, जगाला दिलेली देणगी आहे. योगावर कोणतीही कॉपीराईट, रॉयल्टी आणि पेटंट नाही. योग म्हणजे जीवन जगण्याची पद्धती, एकतेचा संदेश देणारी साधना आहे’, असे सांगितले.

पत्रात काय म्हटले आहे?
हिंदुस्थान आणि अमेरिका हे मित्र आहेत. मित्रांनी एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलले पाहिजे. पंतप्रधान मोदींचे तुम्ही (बायडेन) स्वागत करा पण चर्चेवेळी हिंदुस्थानातील चिंतेच्या विषयांवरही मोदींशी बोला. काही मुद्दे मोदींसमोर थेट मांडा. हिंदुस्थानातील वाढती धार्मिक असहिष्णुता, मानवाधिकाराचे प्रश्न, पत्रकारांना टार्गेट करणे, मीडिया आणि इंटरनेटवर निर्बंध लादणे या मुद्दय़ांवर मोदींशी चर्चा करा.