
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. अमेरिकेत ठिकठिकाणी लॉकडाऊनच्या विरोधात उद्रेक झाला असून नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. मिशिगन येथे तर काही तरुणांनी हातात रिव्हॉल्वर घेऊन आंदोलन केले. मिन्नेसोटा, केंटुकी, उटाह, कॅरोलिना, ओहियो या राज्यांमध्ये आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील देशांनी लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. संकटात सापडलेल्या लोकांना ट्रम्प सरकारने 1200 डॉलर्सची आर्थिक मदत देऊ केली आहे. पण अनेक दिवसांपासून घरातच बसून असलेल्या नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून या संचारबंदीला विरोध करणे चालू केले आहे. अमेरिकेत लॉकडाऊनच्या विरोधात उद्रेक उफाळून आला आहे. मिशिगन, मिन्नेसोटा, ओहियो, उटाह, कॅरिलोना आदी राज्यांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनला विरोध केला. मिशिगन येथे तर काही तरुण रिव्हॉल्वर घेऊन आंदोलनात सहभागी झाले. सुरूवातीला आंदोलक कारमध्येच बसून होते. मात्र नंतर त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच लॉकडाऊनला विरोध केला आहे. बाजारपेठ बंद न करता व्यवहार चालू ठेवावेत असे मत ट्रम्प यांनी वारंवार व्यक्त केले आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी ट्विट करून लॉकडाऊनला विरोध करणाऱया आंदोलनाला पाठिंबा दिला. कोरोनाचे संकट खूप मोठे आहे, परंतु लॉकडाऊनच्या नावाखाली करण्यात येणारा बंदही समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी व्यक्त केली.



























































