पश्चिम गोलार्ध हा आमचा प्रदेश, इथे आमचाच दबदबा, कोणालाही वर्चस्व गाजवू देणार नाही; अमेरिकेचा रशिया, चीनला इशारा

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करत त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली. त्यानंतर आता अमेरिकेने जाहीर केले आहे की, पश्चिम गोलार्ध हा आमचा प्रदेश आहे. इथे आमचाच दबदबा राहणार, आम्ही इतर कोणालाही इथे वर्चस्व गाजवू देणार नाही. संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूतांनी सांगितले आहे की, हा प्रदेश व्हेनेझुएलाला इराण, हिजबुल्लाह, क्यूबाचे गुप्तचर एजंट आणि इतर वाईट घटकांसाठी ऑपरेटिंग हब बनवता येणार नाही. या विधानातून अमेरिकेने चीन आणि रशियाला इशारा दिला आहे.

व्हेनेझुएला संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ यांनी सांगितले आहे की, पश्चिम गोलार्ध हा आमचा प्रदेश आहे आणि अमेरिका या प्रदेशात कोणाचेही वर्चस्व आणि दबाव सहन करणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईची माहिती देताना राजदूत माइक वॉल्ट्झ यांनी हे विधान केले. माइक वॉल्ट्झ यांनी सांगितले की आम्ही पश्चिम गोलार्धाचा वापर आमच्या देशाच्या शत्रूंसाठी, आमच्या स्पर्धकांसाठी आणि अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी ऑपरेशन्सचा तळ म्हणून करू देणार नाही. संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ हे विधान करत असताना, संयुक्त राष्ट्रांमधील व्हेनेझुएलाचे राजदूत संतापले होते.

माइक वॉल्ट्झ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की चीन पश्चिम गोलार्ध आणि दक्षिण अमेरिकेत वेगाने विस्तार करत आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि सचिव रुबियो याचा तीव्र विरोध करत आहेत, परंतु तुम्ही पाहिले आहे की चीन स्वस्त तेल घेत आहे, घुसखोरी करत आहे आणि प्रमुख पदांवर कब्जा करत आहे, आपल्या पश्चिम गोलार्ध, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील बंदरे, रेल्वे आणि अन्न पुरवठा ताब्यात घेत आहे. हा एक गंभीर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. रशियाचा संदर्भ देत ते म्हणाले, आम्ही हिज्बुल्लाह, इराण, रशिया आणि इतरांबद्दल बोलण्यास सुरुवातही केलेली नाही. ट्रम्प यांनी राजनैतिकतेला संधी दिली. त्यांनी मादुरोला अनेक पर्याय दिले. त्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मादुरोने ते स्वीकारण्यास नकार दिला, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम गोलार्धात प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका आणि आजूबाजूचे महासागर समाविष्ट आहेत. त्यात संपूर्ण उत्तर अमेरिकेतील देश कॅनडा, अमेरिका, मेक्सिको आहेत. तर दक्षिण अमेरिकेक ब्राझील, अर्जेंटिना, चिली समाविष्ट आहेत.