गडबड कराल तर परिणाम वाईट होतील; अमेरिकेची इराणला धमकी

25

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता विकोपाला गेला आहे. सौदी अरेबियाच्या दोन तेल केंद्रांवर  इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्यामुळे अमेरिका खवळली आहे. ‘काही गडबड कराल, तर परिणाम वाईट होतील’ अशी उघड धमकीच अमेरिकेने इराणला दिली आहे.

इराणच्या हालचालींबाबत विचारले असता प्रसारमाध्यमांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, ‘इराणबाबत आम्ही बरेच काही ऐकले आहे. ते काहीही करू शकतात, पण त्यांनी आता काही गडबड केली, तर त्यांची खैर नाही. त्यांनी वाईट परिणामांना तोंड द्यायला सज्ज राहावे, असेही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, ‘इराणला कुणी धमकावू शकत नाही,’ असे प्रत्युत्तर इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिले. ते म्हणाले, ‘आम्ही कठीण परिस्थितीत आहोत हे खरे, पण तरीही आमची मान ताठ आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. शत्रूला नेस्तनाबूत करण्याची आमची अजूनही हिंमत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

तणावाचे कारण

तेल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रातील (ओपेक) प्रमुख असलेल्या सौदी अरेबियाच्या मुख्य इंधनवाहिनीवर येमेनच्या हुथी बंडखोरांनी ड्रोनने हल्ला केला. त्याचबरोबर सौदीच्या विविध तेल केंद्रांवर हल्ले करू, असा इशारा हुथी बंडखोरांनी दिला आहे. दरम्यान, ड्रोनहल्ल्यांनतर सौदी अरेबियाने मुख्य इंधनवाहिनीचे पंपिंग बंद केले आहे. सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील लाल समुद्रानजीकच्या इंधनवाहिनीवरील दोन ऑईल पंपिंग स्टेशनवर ड्रोनहल्ला करण्यात आला. या मोठय़ा पाइपलाइनची दररोज 50 लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या