
चीनने हिंदुस्थानच्या लडाख सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केले आहेत. चीन हा धोकादायक देश आहे. चीनकडून क्वाड देशांना (अमेरिका, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि जपान) धोका आहे, अशी धक्कादायक माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी दिली. चीन विरोधातील लढाईत हिंदुस्थानला अमेरिकेच्या मदतीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच जपानची राजधानी टोकियो येथे झाली. या बैठकीनंतर अमेरिकेत परत गेलेले परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी तीन मुलाखती दिल्या. ‘गाय बेनसन शो’ ला मुलाखत देताना चीनी लालमाकडांचा कुटील डाव त्यांनी उघड केला आहे.
काय म्हणाले परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ
हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान ही चार मोठी लोकशाही राष्ट्रे आहेत. या चारही देशांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे असे पॉम्पिओ म्हणाले.
हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा झाली. चीनच्या धोक्याची जाणीव आम्ही चारही देशांना आहे.
हिंदुस्थानला हिमालयात चीनसोबत लढा द्यावा लागत आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने तब्बल 60 हजार सैनिक लडाख सीमेवर तैनात केले आहेत. चीनविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानला अमेरिकेच्या मदतीची गरज आहे.
कोरोना काळातील पहिली बैठक
कोरोनाचा संसर्ग सहा महिन्यानंतर पूर्णपणे थांबलेला नाही. गेल्या सहा महिन्यात व्हर्च्युअल पद्धतीने आंतरराष्ट्रीय बैठका होत आहे. कोरोना काळात चार प्रमुख देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची समोरासमोर झालेली टोकियोतील ही पहिली बैठक आहे. यावेळी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पॉम्पिओ यांच्यात दीर्घ चर्चा झाली.



























































