हिंदुस्थानची तटबंदी आणखी मजबूत होणार, रशिया-हिंदुस्थानच्या एस-400 प्रणाली डीलकडे अमेरिकेची करडी नजर

पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये संरक्षण प्रणाली एस-400 मुळे पाकिस्तानची झोप उडाली होती. पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हवेतच हाणून पाडण्यात एस-400 या संरक्षण प्रणालीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. हिंदुस्थानला रशियाकडून तीन एस-400 सिस्टम मिळाल्या आहेत. आता उर्वरित आणखी येत्या दोन वर्षांत म्हणजेच 2026-27 पर्यंत मिळणार आहेत. हिंदुस्थान आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये पाच एस-400 प्रणाली खरेदी करण्याचा करार झाला होता. हा करार 48 हजार कोटी रुपयांचा होता.

सध्या हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन देशांतील संबंध बिघडले आहेत. जर रशियाने हिंदुस्थानला आणखी दोन एस-400 प्रणाली दिली तर अमेरिका हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेऊ शकतो. या कराराबाबत काही आव्हाने आहेत. जर हिंदुस्थानने एस-400 खरेदी केली तर अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यांतर्गत निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता. चीनदेखील या करारावर लक्ष ठेवून आहे. कारण तो स्वतः ही प्रणाली वापरत आहे.

काय आहे एस-400 संरक्षण प्रणाली

  • रशियाची एस-400 ट्रायम्फ ही सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या प्रणालीला 2007 मध्ये लाँच करण्यात आले होते. ही प्रणाली शत्रूंची लढाऊ विमाने, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अगदी स्टेल्थ विमानेदेखील पाडू शकते. हवेतील अनेक प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ती एक मजबूत ढाल म्हणून काम करते.
  • एस-400 प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती जवळपास 600 किलोमीटर अंतरावरून अनेक लक्ष्य शोधते.
  • एस-400 च्या एका स्क्वॉड्रनमध्ये 256 क्षेपणास्त्रे आहेत. हिंदुस्थानकडे सध्या 3 स्क्वॉड्रन आहेत.
  • पहिले स्क्वॉड्रन 2021 मध्ये रशियाने हिंदुस्थानकडे सोपवले. हे पंजाबमध्ये तैनात असून पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडून येणाऱ्या धोक्यांना रोखण्यासाठी आहे.
  • दुसरे स्क्वॉड्रन जुलै 2022 मध्ये मिळाले. हे सिक्कीमच्या सीमेवर तैनात आहे.
  • तिसरे फेब्रुवारी 2023 मध्ये मिळाले.