अमेरिकेच्या नौदलाने समुद्रात फोडला 18 हजार किलोंचा महाकाय बॉम्ब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन समुद्रमार्गे लढाईच्या दृष्टीने अधिकाधिक सज्ज होत आहे. चीनच्या वाढत्या समुद्री ताकदीचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन नौदलाने आपल्या नवीन एअरक्राफ्ट पॅरिअरवर बॉम्बहल्ल्याची चाचणी केली. यासाठी जवळपास 18 हजार किलो क्षमतेच्या महाकाय बॉम्बचा भीषण स्फोट समुद्रात घडवून आणला.

अमेरिकेच्या नौदलाने आपल्या युद्धाच्या तयारीचे परीक्षण करण्यासाठी 18000 किलोग्रॅम वजनाच्या महाकाय बॉम्बची चाचणी भरसमुद्रात केली. पाण्याच्या आत करण्यात आलेल्या या स्फोटामुळे समुद्राच्या आत 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपासारखे हादरे जाणवले. युद्धप्रसंगी एखाद्या हल्ल्यात एअरक्राफ्ट कॅरिअर किती मारा झेलू शकतो यासाठी ही चाचणी करण्यात आली.

स्फोट पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा

भरसमुद्रात करण्यात आलेल्या महाबॉम्ब स्फोटामुळे सर्वांनाच धडकी भरली आहे. मात्र अमेरिकेच्या नौदलाने हा एक पूर्णपणे सुरक्षित केलेला विस्फोट होता. या स्फोटातून एअरक्राफ्ट कॅरिअरच्या भविष्यातील युद्धाच्या शक्यता तपासल्या गेल्या. या स्फोटाचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

महास्फोटाचा व्हिडीओ व्हायरल

अमेरिकन नौदलाने याला ‘फुल शिप शॉक ट्रायल’ असे म्हटले आहे. मागील शुक्रवारी फ्लोरिडातील डायटोना किनाऱयापासून 100 मैल अंतरावर ही चाचणी झाली. या महास्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या बॉम्बस्फोटाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. या व्हिडीओत तीन प्रस्तावित स्फोटांबद्दल सांगितले गेले आहे.