
तुम्ही कधी कोणत्या इंजिनिअरला हाय हिल्स आणि स्कर्ट घालून ऑफिसमध्ये जाताना पाहिले आहे का? आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल माहिती सांगणार आहोत, जे तीन मुलांचे वडील असून पेशाने इंजिनिअर आहेत. मात्र ऑफिसला किंवा सामान्य जीवनात पोशाक म्हणून ते हाय हिल्स आणि स्कर्ट परिधान करतात. रोबोट इंजिनिअर मार्क ब्रायन असं या अमेरिकन व्यक्तीचं नाव असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ब्रायन असा पोशक का परिधान करतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लैंगिक भेदभाव करणाऱ्यांना आवाहन देण्यासाठी ब्रायन असा पोषक परिधान करतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
स्कर्ट आणि हाय हिल्स घालणारे ब्रायन यांच्या लग्नाला 11 वर्ष झाली असून त्यांच्या पत्नीचा त्यांच्या या ड्रेसिंग स्टाईलला पूर्ण पाठिंबा आहे. अनेकवेळा त्यांच्या पत्नी त्यांना कपडे निवडण्यासाठीही त्यांची मदत करतात. त्यांच्या तीन मुलांना त्यांची हाय हिल्स आवडते. ‘झी न्यूज’शी बोलताना ब्रायन म्हणाले की, ‘स्त्री-पुरुष या वादात न अडकता आपल्याला आवडेल ते आपण परिधान करायला हवे. कोणत्याही स्टईलला लिंगाशी जोडणे चुकीचे आहे.
61 वर्षीय ब्रायन म्हणतात, ‘मी मागील 35 वर्षांपासून कॉर्पोरेट वातावरणात काम करत असून मला नेहमीच सूट आणि टाय परिधान करावी लागत होती. या गोष्टींना मी फार वैतागलो होतो. त्यात टायचे रंगही तेच लाल, काळे आणि निळे.’
असं बदलेले ब्रायनचे आयुष्य
ब्रायन यांनी सांगितलं, ‘एक दिवशी मी बुटांची खरेदी करण्यासाठी दुकानात गेलो होतो. त्यावेळी मी वुमन्स सेक्शनमध्ये गेलो असता मला काही चांगले रंग दिसले. त्यावेळी मी बूट ऐवजी हाय हिल्स घालण्याचा विचार केला. यानंतर पुढे मी हाय हिल्सच घालू लागलो. मात्र त्यावेळीही मी सफेद शर्ट आणि काळी पँट परिधान करत होतो. एकदा मी ऑफिसमध्ये असताना माझ्या सहकाऱ्यांनी गंमतीशीरपणे सांगितले की एखाद्या दिवशी तू स्कर्ट घालायला सुरूवात करशील. मी विचार केला, हेही ठीक आहे. त्यानंतर मी स्कर्ट घालायला सुरुवात केली.’



























































