
सामना प्रतिनिधी । नगर
हिंदुस्थानी पालकांनी दत्तक घेण्यास नाकारलेल्या बालिकेला अमेरिकन पालकांनी स्वीकारले आहे. त्यामुळे तिचे भविष्य उज्वल झाले आहे. उद्या २ मार्च २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता हा दत्तक विधान सोहळा ‘स्नेहांकुर दत्तक केंद्र’, केडगाव येथे संपन्न होणार असल्याची माहिती स्नेहांकुरचे प्रकल्प व्यवस्थापक बाळासाहेब वारुळे यांनी दिली.
कु.माधुरी २०१८ मध्ये बाल कल्याण समितीच्या आदेशाने स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रात दाखल झाली. नुकतीच जन्मलेली माधुरी अतिशय अशक्त तर होतीच शिवाय तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. स्नेहांकुर येथील कर्मचाऱ्यांनी कु. माधुरीला लगेचच तज्ञ डॉक्टरांकडे तपासण्यासाठी नेले. जन्मतःच माधुरीची अन्ननलिका आणि श्वसन नलिका एकत्र असल्याचे तपासण्या झाल्यावर निष्पन्न झाले. याशिवाय तिला मलविसर्जनाची जागा देखील नव्हती. स्नेहांकुरने तातडीने तिला योग्य उपचारासाठी बाल शल्यचिकित्सक डॉ. हेमंत नाईक यांच्याकडे नेले. डॉ. नाईक यांनी तिच्यावर दोन शस्त्रक्रिया लगेच कराव्या लागतील, असे सांगितले. स्नेहान्कुर मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय घेऊन दोन्ही शस्त्रक्रिया करण्यास डॉ.नाईक यांना सांगितले. रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यावर अनेक सूचनांसह माधुरीची रवानगी परत स्नेहान्कुर येथे झाली.
माधुरी स्नेहांकुर येथे आल्यावरही तिच्यावर विशेष वैद्यकीय उपचार आणि काळजी घेणे सुरूच राहिले. विशेष आहार, आहार देण्याची योग्य पद्धत, तिच्या वेळा सांभाळणे, कुठल्याही संसर्ग होण्यापासून जपणे, असे सगळे सांभाळणे अपरिहार्य होते. स्नेहान्कुर येथील नर्स, आया, डॉक्टर यांनी ही सर्व काळजी अतिशय योग्य प्रकारे घेतली.
कु. माधुरी ही पूर्णतः बरी झाल्यावर तिला योग्य पालक मिळावे म्हणून तिची नोंदणी संकेतस्थळावर स्नेहांकुरने केली. परंतु हिंदुस्थानी पालकांनी माधुरीला पसंती दिली नाही. अखेर तिला अमेरिकन जोडपे सुसान आणि जॉन्सन यांनी स्वीकारले. जॉनसन हे अमेरिकेत अकाउंट मॅनेजर आहेत तर त्यांच्या पत्नी सुसान ह्या गृहीणी आहेत.
उद्या २ मार्च २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, हॉटेल संदीप शेजारी येथे दत्तक विधान सोहळा पार पडणार असून नगर येथील गॅलेक्सी नॅशनल स्कुलच्या संस्थापिका आणि प्राचार्या सौ.उषा देशमुख यांच्याहस्ते कु.माधुरीला पालकांच्या सुपूर्त करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व नगरकरांसाठी खुला असल्याचे स्नेहांकुरच्या सौ.जुई झावरे-शिंदे यांनी सांगितले.
































































