अमेठीत काँग्रेसचा उमेदवार वेटिंगवर; ब्लॉक अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेसने अद्याप अमेठी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी करत अमेठीतील गौरीगंज येथील काँग्रेस भवन परिसरात कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तर ब्लॉक अध्यक्ष अविनाश मिश्रा सेनानी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी जाहीर केली नाही तर मी आत्महत्या करीन, असा इशारा अविनाश मिश्रा सेनानी यांनी दिला आहे. काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांची मानसिक अवस्था अत्यंत बिकट बनली असून आता गांधी कुटुंबालाच अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल, असेही मिश्रा सेनानी यांनी म्हटले आहे.