
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर आक्षेप घेत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. अपक्ष उमेदवाराने राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत अमेठी लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. यावर सोमवारी 22 एप्रिलला सुनावणी झाली. यात निवडणूक आयोगाने उमेदवारीवरील आक्षेप फेटाळल्याने राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढण्यास पात्र ठरले आहेत.
Amethi returning officer declares Congress President Rahul Gandhi’s nomination valid. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Io0WZYQoLX
— ANI UP (@ANINewsUP) April 22, 2019
अमेठी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वाविरोधात निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. ध्रुवलाल यांनी वकील रवी प्रकाश यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाला आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी बॅकऑफ्स या कंपनीत गुंतवणूक करताना स्वतःला ब्रिटनचे नागरिक असल्याचे म्हटले होते. यासंदर्भातील कागदपत्रांच्या आधारे उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे राहुल यांचा अमेठीतून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



























































